भाव वाढताच मका उत्पादकांची खरेदी केंद्राकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 07:05 PM2019-01-10T19:05:29+5:302019-01-10T19:05:49+5:30
नाशिक जिल्ह्यात ५४९२ शेतक-यांनी आधारभूत किमतीत मका विक्री करण्यासाठी शासनाकडे आॅनलाइन नोंदणी केली आहे. खुल्या बाजारात व्यापा-यांकडून कमी दरात मका खरेदी करून अडवणूक केली जात असल्यामुळे शासनाने यंदा १७०० रुपये क्विंटल असा दर दिला आहे. डिसेंबरअखेर जेमतेम आठशे शेतक-यांचा मका आजवर खरेदी केंद्रावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आधारभूत किमतीत मका विक्री करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल मका पडून असल्यामुळे राज्य सरकारने खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली असली तरी, खुल्या बाजारात अचानक मक्याचे भाव वाढल्यामुळे शेतक-यांनी शासनाच्या केंद्राकडे पाठ फिरवून व्यापा-यांच्या दारात मका आणून टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.
नाशिक जिल्ह्यात ५४९२ शेतक-यांनी आधारभूत किमतीत मका विक्री करण्यासाठी शासनाकडे आॅनलाइन नोंदणी केली आहे. खुल्या बाजारात व्यापा-यांकडून कमी दरात मका खरेदी करून अडवणूक केली जात असल्यामुळे शासनाने यंदा १७०० रुपये क्विंटल असा दर दिला आहे. डिसेंबरअखेर जेमतेम आठशे शेतक-यांचा मका आजवर खरेदी केंद्रावर आला आहे. जिल्ह्यातील शेतक-यांकडील मका खरेदीसाठी दहा ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मध्यंतरी खुल्या बाजारात मक्याचे भाव अचानक दीडशे रुपयांनी वाढल्यामुळे शेतकºयांनी खरेदी केंद्राऐवजी व्यापा-यांना मक्याची विक्री केली, परंतु आवक वाढल्यामुळे पुन्हा मक्याचे भाव खाली आल्याने शेतकºयांनी खरेदी केंद्रावर धाव घेतली. डिसेंबरअखेर जिल्ह्यात जवळपास पन्नास हजार क्विंटल मका शिल्लक असण्याच्या शक्यतेने शासनाने १५ जानेवारीपर्यंत मका खरेदीला मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील दहाही केंद्रांवर ही खरेदी होत असताना व्यापा-यांनी पुन्हा खुल्या बाजारात मक्याला १७८० रुपये दर जाहीर केल्याने शेतक-यांनी व्यापा-यांकडे धाव घेण्यास सुरुवात केली असून, गेल्या चार दिवसांपासून फक्त सिन्नर, मालेगाव, देवळा व लासलगाव या चारच केंद्रांवर शेतक-यांनी मका विक्रीसाठी आणला आहे. अन्य केंद्रांवर मात्र मक्याची खरेदी होऊ शकलेली नाही. त्यामुळे शासनाने वाढवून दिलेली मुदत संपुष्टात येण्यास अवघ्या पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असून, या काळात किती उत्पादक मका विक्रीसाठी केंद्रावर आणतात याकडे मार्केट फेडरेशनचे लक्ष लागले आहे.