कोठारी कन्या शाळेत पाठ्यपुस्तक वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:57 PM2018-06-15T23:57:48+5:302018-06-15T23:57:48+5:30
जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींची प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींचे स्वागत करून पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
नाशिकरोड : जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींची प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींचे स्वागत करून पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त शाळेमध्ये पताका, फुगे लावून सजावट करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प, फुगे, खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक सुरेखा बोकडे यांच्या हस्ते पहिल्या दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प, फुगे, खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. शालेय समिती अध्यक्ष विश्वास बोडके, मुख्याध्यापक सुरेखा बोकडे, पर्यवेक्षक कैलास पाटील, पालक संघ उपाध्यक्षा शुभांगी गगनभिडे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विद्या लाड, व्यवस्थापन समिती सदस्य जगन्नाथ गायकवाड आदिंच्या हस्ते विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके व संस्थेच्या संगणक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सुरेखा पाटील व आभार जयश्री भडके यांनी मानले. यावेळी सुनीता सोनगिरे, रेखा पगार, छाया जाधव, सुषमा यादव, मानसी झनकर, शोभा गरुड, रेवती बुरकुले, निर्मला दिवेकर आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा विल्होळी
विल्होळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रथमत: नवागतांचे कुंकुम तिलक करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशदिंडी, प्रभातफेरी, रथयात्रा काढण्यात आली. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप, गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, मनोहर भावनाथ, अनिल भावनाथ, संतोष आल्हाट, मुख्याध्यापक रवींद्र भदाणे तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी, गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
मातोरी परिसरातील शाळांत स्वागत
मातोरी परिसरातील शाळांचा पहिला दिवस आनंदात व वाजत गाजत झाला, तर नवीन दाखल विद्यार्थ्यांना चॉकलेट व गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखल करण्यासाठी पालकांनी पहिल्या दिवशीच गर्दी केली. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी गावातील प्रत्येक घरात जाऊन शालेय जनजागृती केली, तसेच शाळेत दाखल विद्यार्थ्यांच्या घराच्या दारावर नोंदही केली, तसेच विद्यार्थी व पालक यांचे स्वागत करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर तोरणं लावत, रांगोळी काढून व गुलाबाचे फूल देत ढोलताशांच्या स्वरात स्वागत करण्यात आले.