"लोकशाहीवरील हा जबरदस्त हल्ला..."; मनिष सिसोदियांच्या अटकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 08:15 PM2023-02-27T20:15:22+5:302023-02-27T20:16:22+5:30
दिल्लीचे उपमु्ख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या अटकेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मद्य घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. आता रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण २०२१-२२ च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी न्यायालयाने रविवारी सिसोदिया यांना अटक करण्यात होती.
सिसोदिया यांना आज राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. राऊस अॅव्हेन्यू कोर्ट कॉम्प्लेक्सच्या आत आणि बाहेर कडक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या वकिलांच्या युक्तिवादाला विरोध केला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला की सीबीआय कोणत्याही परिस्थितीत तपास करू शकते.
मनिष सिसोदियांच्या या अटकेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. हा लोकशाहीवरील जबरदस्त हल्ला आहे. ते उपमुख्यमंत्री आहे. अनेक खाते देखील त्यांच्याकडे आहे. त्यांनी शाळांना जो दर्जा प्राप्त करून दिला. त्यांची जगात वाहवा होतेय, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, अशी टीकाही संजय राऊतांनी केली. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, आज शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यलयातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले. यावर देखील संजय राऊतांनी भाष्य केलं. तुम्ही आयुष्यभर ज्यांचं मीठ खाल्लं, ज्यांनी तुम्हाला आयुष्यात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिला. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत ज्यांनी तुम्हाला विविध पदावर नेमलं, म्हणून तुम्ही आज गद्दारीची क्रांती करू शकलात. तुम्ही त्यांचे फोटो काढता याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. तसेच शिंदे गटाचं संबंधित कृत्य हा शूद्रपणा आहे, तो हलकटपणा आहे, असा निशाणाही संजय राऊतांनी साधला. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.