ठेकेदाराने वेतन न दिल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:37 AM2017-07-30T01:37:50+5:302017-07-30T01:38:06+5:30
वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स नाशिक या कंपनीच्या ठेकेदारामार्फत जून महिन्यापासून ते आजपर्यंत कामगारांच्या पगाराचे वाटप न झाल्याने मालेगाव घंटागाडी साफसफाई कामगार युनियनतर्फे संप पुकारण्यात आला.
मालेगाव : वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स नाशिक या कंपनीच्या ठेकेदारामार्फत जून महिन्यापासून ते आजपर्यंत कामगारांच्या पगाराचे वाटप न झाल्याने मालेगाव घंटागाडी साफसफाई कामगार युनियनतर्फे संप पुकारण्यात आला. याबाबत किल्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षकांना कामगारांनी निवेदन दिले. निवेदनात, वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स कंपनीने २ जानेवारी २०१३ पासून मालेगाव महानगरपालिका हद्दीत कचरा संकलन करण्याचा ठेका घेतला आहे. ठेका सुरू झाल्यापासून आजपर्यंत कामगार घंटागाडीद्वारे नियमितपणे कचरा संकलनाचे काम करीत आहेत. परंतु ठेकेदारामार्फत नियमित वेतन देण्यात येत नाही. ठेका चालविणारे आबीद शेख हे वारंवार खोटी आश्वासने देत असून, तुमचे वेतन १० तारखेपर्यंत करण्यात येईल, असे सांगितले जाते. महिनाअखेरीस वेतन मिळते. सदर वेतन १० तारखेपर्यंत देण्यात यावे, कामगारांची परिस्थिती गरिबीची असून, या व्यवसायांवर त्यांच्या कुटुंबांचा उदरहनिर्वाह चालतो. दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कुटुंबीयांची उपासमार होत आहे. किल्ला पोलिसांनी वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स कंपनीशी मध्यस्थी करून मनपाशी झालेल्या कराराप्रमाणे थकीत वेतन अदा करावे, वेतन मिळेपर्यंत काम बंद राहील, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर विकास हिरे, दिनेश जगताप, भारत अहिरे, जयेश अहिरे, दीपक मोरे, सुरेश शिंदे, अविनाश पटाईत, मोहन राजवंशी, सोमनाथ अहिरे, मुश्ताक सय्यद आदी कामगारांच्या सह्या आहेत.