ठक्कर डोमदेखील बंदच्या मार्गावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:27+5:302021-01-21T04:14:27+5:30
नाशिक : कोविडच्या प्रसारास प्रारंभ झाल्यापासून नाशिक शहरात कोविड सेंटरला प्रारंभ करण्यात आला होता. त्यातील तपोवन, समाजकल्याण आणि मेरी ...
नाशिक : कोविडच्या प्रसारास प्रारंभ झाल्यापासून नाशिक शहरात कोविड सेंटरला प्रारंभ करण्यात आला होता. त्यातील तपोवन, समाजकल्याण आणि मेरी हे तीन कोविड केअर सेंटर मावळत्या वर्षाच्या अखेरीसच बंद करण्यात आले होते. आता नाशिकमधील सर्वात मोठ्या ठक्कर डोममध्येदेखील रुग्णसंख्या अत्यल्प असून लसदेखील दाखल झाली असल्याने हे सेंटरदेखील बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे.
नाशिकमध्ये प्रारंभी १० ठिकाणी कोविड केअर सेंटर उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर लहान-लहान केंद्रांऐवजी मोठी केअर सेंटर उभारल्यास कमी मनुष्यबळात तेथील रुग्ण हाताळणे शक्य असल्याचे लक्षात आल्याने महापालिकेने मोठमोठी कोविड केअर सेंटर्स उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, मे महिन्यात कोरोनाचा प्रकोप वाढू लागल्यावर ठक्कर डोम परिसरात नाशिकमधील सर्वात भव्य ३५० हून अधिक बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, ऑगस्ट महिन्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. प्रारंभी मालेगावमध्ये असलेला कोरोनाचा कहर ऑगस्ट महिन्यापर्यंत नाशिक शहरातदेखील झाला. दरम्यानच्या काळात सुरू करण्यात आलेले तपोवन कोविड सेंटर, समाजकल्याणचे कोविड सेंटर तसेच मेरीचे कोविड सेंटरदेखील ओसंडून गेले होते. सप्टेंबर महिन्यात तर नाशिकच्या कोणत्याही कोविड सेंटरमध्ये जागा उरली नव्हती. केवळ काही प्रमाणात ठक्कर डोममध्येच जागा उपलब्ध होती. मात्र, त्यानंतरच्या काळात ऑक्टोबरपासून कोराेनाचा कहर कमी झाल्यामुळे या सेंटरमधील संख्या हळूहळू रोडावत गेली आहे. जानेवारीपासून तर ही संख्या दोन आकड्यात आली असल्यामुळे ठक्कर डोममधील कोविड सेंटरदेखील लवकरच बंद करण्यात येणार आहे.