ठाकूर होते कृतीशील कार्यकर्ते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:16 AM2021-03-23T04:16:05+5:302021-03-23T04:16:05+5:30
नाशिक : अनेक सामाजिक कार्यकर्ते केवळ वैचारिक स्तरावरच कार्यरत राहतात. मात्र, अरुण ठाकूर हे कृतीशील कार्यकर्ते होते. म्हणूनच त्यांच्या ...
नाशिक : अनेक सामाजिक कार्यकर्ते केवळ वैचारिक स्तरावरच कार्यरत राहतात. मात्र, अरुण ठाकूर हे कृतीशील कार्यकर्ते होते. म्हणूनच त्यांच्या हातून आनंद निकेतनसारख्या सामाजिक आदर्श प्रस्थापित करणाऱ्या शाळेचे निर्माण होऊ शकल्याचे ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी सांगितले. अरुण खातू यांच्या काही लेखांसह त्यांच्या मित्र परिवाराने त्यांच्या आठवणींवरील लेखाचा समावेश असलेल्या अरुण : वसा आणि वारसा या पुस्तकाचे प्रकाशन खातू यांच्या हस्ते झाल्यानंतर ते बोलत होते.
पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाइन पद्धतीने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजीत झा उपस्थित होते. यावेळी बोलताना खातू यांनी शासनावर अवलंबून न राहता स्वत: कार्यप्रवण झाल्यास समाज पाठीशी उभा राहून मोठे कार्य उभे करता येते हे ठाकूर यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिल्याचे सांगितले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आनंद निकेतनसारख्या शाळेचे कार्य उभे राहू शकल्याचे नमूद केले. झा यांनी ठाकूर हे त्यांची मते ठामपणे मांडणारे आणि भविष्याचा वेध घेणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. या पुस्तकात काही लेख हे ठाकूर यांचे तर काही लेख त्यांच्या मित्र परिवाराने त्यांच्याशी निगडित आठवणींवर लिहिलेले असून काही लेख हे आनंद निकेतन शाळेचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी लिहिलेले आहेत. पुस्तकाचे संपादन मिलिंद तांबे आणि सुनीती सु,र. यांचे आहे. कार्यक्रमाच्या अखेरीस निशा शिवूरकर यांनी ठाकूर हे सर्वांशी मैत्रीभाव जपणारे अनोखे व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगून आभार मानले.