अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद मोर्चा
By admin | Published: December 15, 2015 12:20 AM2015-12-15T00:20:40+5:302015-12-15T00:23:49+5:30
अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद मोर्चा
नाशिकरोड : सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांकरिता राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी ‘थाळीनाद’ मोर्चा काढून निवेदन दिले.
अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी के. जे. मेहता हायस्कूल येथून नाशिक-पुणे महामार्गाने बिटको चौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या हजारो अंगणवाडी सेविकांनी जोरदार थाळीनाद करत व घोषणा देत काढलेला मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्याने नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
विभागीय आयुक्त कार्यालय येथे मोर्चा अडविल्यानंतर विभागीय अपर आयुक्त के.डी. कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे हे मोर्चेकऱ्यांसमोर आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन तुमच्या मागण्या या लवकरच शासनाला कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
मोर्चामध्ये सफाई कामगार नेते मिलिंद रानडे, अंगणवाडी कर्मचारी संघाचे बृजपाल सिंह, मंगला सराफ, युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, कल्पना गायकवाड आदिंसह उत्तर महाराष्ट्रातील हजारो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)