मालेगावी साथीच्या आजारांचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:47+5:302021-09-23T04:15:47+5:30
सोयगाव (मालेगाव) : सध्या कोरोना संकट काही प्रमाणात टळले असले तरी पावसाळा असल्याने साथीच्या आजारांनी मालेगाव व तालुक्यात थैमान ...
सोयगाव (मालेगाव) : सध्या कोरोना संकट काही प्रमाणात टळले असले तरी पावसाळा असल्याने साथीच्या आजारांनी मालेगाव व तालुक्यात थैमान घातले आहे. सध्या मलेरिया, डेंग्यू, व्हायरल इन्फेक्शन, व्हायरल फिव्हर यांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये व्हायरलचे रुग्ण जास्त असल्याचे समजते. मात्र, डेंग्यूची खरी आकडेवारी मात्र गुलदस्त्यात आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात जुलै महिन्यापासून डेंग्यू रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. खाजगी रक्तपेढ्यांनी दररोज होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांचा दैनंदिन अहवाल महानगरपालिकेला कळवणे आवश्यक असताना तसे होत नाही. शिवाय डेंग्यू रुग्ण बाधित आढळल्यास काही खाजगी हॉस्पिटलमधील जागरूक डॉक्टर्स महानगरपालिकेला कळवतात, तर काही कळवतच नाहीत. त्यामुळे आरोग्य खात्यास गांभीर्य लक्षात कसे येणार, त्यावर उपाययोजना कशा होणार? खाजगी डॉक्टर्सने डेंग्यू रुग्णाची माहिती महानगरपालिकेस कळवण्याची मुख्य दोन करणे आहेत. पहिले म्हणजे डेंग्यू रुग्णाचा पत्ता महानगरपालिकेस मिळून तो परिसर सॅनेटाइज करणे, घरातील इतर सदस्यांचे रक्त नमुने घेणे व दुसरे म्हणजे स्वतः डेंग्यू रुग्णाचे रक्त नमुने घेऊन पुन्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायरॉलॉजीकडे पाठवणे; पण असे नमुने मालेगावात घेतले जातात का? नसतील घेतले जात तर का? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. याबाबत महानगरपालिकेने प्रत्येक खाजगी रक्तपेढीला डेंग्यू व तत्सम रुग्णांविषयी माहिती कळवण्याचे पत्र दिले असून, रक्तपेढ्या दैनंदिन अहवाल देत नाहीत, तसेच मालेगावातील सगळ्या खाजगी डॉक्टरांनी डेंग्यू रिपोर्ट करणे गरजेचे आहे.
--------------------
आरोग्य खातेच संशयाच्या भोवऱ्यात
५२ संशयित रुग्णांपैकी फक्त ३ बाधित असल्याचे आढळून आले असले तरी मात्र खाजगी रुग्णालयात सरकारी आकडेवारीपेक्षा संख्या जास्तच रुग्ण आढळून येत आहेत. सरकारी व खाजगी डेंग्यू आकडेवारीच्या तफावतीमुळे आरोग्य खातेच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. जनतेला डेंग्यूची खरी आकडेवारी कळणे आवश्यक आहे, जेणेकरून जनतेत जागरूकता वाढून खबरदारीचे उपाय केले जातील, असे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे.
----------------------
आम्ही अगोदरच सगळ्या खाजगी रक्तपेढ्यांना व खाजगी डॉक्टरांना याबाबत लेटर्स (सूचना) दिली आहेत; पण ते दैनंदिन रिपोर्ट करत नाहीत. तरी पुन्हा पत्र देऊन रिपोर्ट करण्याबाबत सक्त ताकीद दिली जाईल. जेणेकरून जनतेच्या आरोग्याला प्राधान्यक्रम दिला जाईल.
-डॉ. सपना ठाकरे, वैद्यकीय अधिकारी, मालेगाव