ठाणगावला दिवसाढवळ्या वृक्षतोड ; कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:16 AM2018-03-27T00:16:28+5:302018-03-27T00:16:28+5:30
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसरात दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल होत असून, वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसरात दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल होत असून, वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. वनविभागाचे सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर क्षेत्र या भागात आहे. परिसरात वन्यप्राण्यांची संख्यादेखील जास्त आहे. वनविभागाने या परिसरातील मारुतीचा मोडा भागात नवीन वृक्षांची लागवड केलेली आहे. या भागात वृक्षांचे प्रमाण अधिक असल्याने व उन्हाळ्याची चाहूल लागल्याने महिलांच्या हाताला काही काम नसल्याने महिलांचा मोर्चा आता जंगलातील झाडांकडे वळालेला दिसत आहे. महिला सकाळी किंवा रात्रीच्या वेळी लाकडे गोळा करून सरपणाची मोळी घेऊन येताना दिसतात. वनविभागाच्या वतीने कर्मचारी दिवसभर तळ ठोकून असतात. पण जोपर्यंत वन कर्मचारी तळ ठोकून असतात तोपर्यंत महिला जंगलात जात नाहीत. मारुतीचा मोडा, उंबरदरी धरण परिसर, लावदरी, भिकरवाडी परिसर आदी भागात जंगलातील वृक्षांचे प्रमाण जास्तच असल्याने महिलावर्ग लाकडे तोडण्यासाठी या भागात जात असतात. महिला झाडाची कत्तल करून एक दोन दिवस लाकडे सुकण्यासाठी ठेवतात व त्यानंतर घेऊन जातात. सकाळी दिवस उजाडण्याच्या अगोदर सरपणाची मोळी घेऊन येतात. वनविभागाने दिवसा व रात्री गस्त घालावी व जंगलतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वनविभागाच्या वतीने वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. मारुती मोढा परिसरात मोरांचे प्रमाण अधिक असून, या भागात लोकवस्तीही जास्त आहे.
मानवी वस्तीकडे मोरांचे जाणे-येणे अधिक असल्याने पाणवठे उभी केली तर वस्तीवर राहणारा लोकांना सुध्दा त्या पाणवडयात पाणी टाकता येऊ शकेल. परिसरात अन्य हिंस्त्र प्राण्यांचे प्रमाण जास्त असूनदेखील महिला सरपण गोळा करण्यासाठी जाताना दिसतात. कडक उन्हाळा लागलेला असून, वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे वळत आहेत. पावसाळ्याच्या सरपणासाठी महिला सरसकट जिवंत वृक्षांवर कुºहाड चालवत आहेत.