कृतज्ञता हा जीवनातील महान गुण : सुरीश्वरजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:33 AM2019-02-24T00:33:09+5:302019-02-24T00:33:44+5:30
पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.
नाशिकरोड : पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.
लॅमरोड बालगृहरोड येथील कालापूर्णम् धाममध्ये उपधान तपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, केलेल्या उपकारांना विसरून जाणे म्हणजे कृतघ्नता हा सर्वांत मोठा दुर्गुण आहे. उपधान तपातील आराधकांना मी उत्तम कृतज्ञ मानत आहे. उपधान तप पूर्ण झाल्यानंतर साधकांची पाप रसिकता घटायला हवी व धर्म रसिकता वाढायला हवी. तसेच मोक्ष रसिकता हृदयात जन्मायला यावी. पापाच्या अशुचित आपण सर्व आतापर्यंत अडकलेलो होतो. मात्र आता उपधान तपाच्या स्नानकुंडात शुद्ध झाल्यानंतर पुन्हा अनाचाराने आत्मा मलीन न होण्यासाठीच तुम्हाला व्रत, नियम, बंधन यांची नियमावली दिलेली आहे. ही नियमावली तुमच्या आत्म्याच्या संरक्षणासाठी तिजोरी स्वरूप आहेत. ज्याप्रमाणे पैशाला तिजोरीत ठेवल्यानंतर आपण निश्चिंत होतो. तसेच तुमचे आत्मधन सुरक्षित ठेवायचे असेल तर उपधान तपाच्या नियमांची तिजोरी घेऊन जाणे आवश्यक आहे. तुम्ही सुखाचा आनंद स्वचित अनुभवला असेल, खाण्याचा आनंद अनुभवण्याची जी संधी लाभली आहे ती तुमच्या जीवनासाठी सुवर्णसंधी म्हणून सदा अविस्मरणीय होवो असे सांगत जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी शालिभद्रच्या कथेचा काही भाग सांगितला.
दीक्षार्थी वरघोडा शोभायात्रा
उपधान तपातील मुंबई येथील महिला साधक मंजूलाबेन निमावत व सुरत येथील १३ वर्षांची मुलगी मोक्षाबेन शाह या दीक्षार्थींची वरघोडा शोभायात्रा शनिवारी सकाळी बेलतगव्हाणरोड कहाननगरपासून बालगृहरोड कलापूर्णम् तीर्थधामपर्यंत काढण्यात आली होती. दीक्षार्थी वरघोडा शोभायात्रेत गच्छाधिराज जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांच्यासह आचार्य, साधू-संत, साध्वी, साधक, जैन बांधव सहभागी झाले होते. सायंकाळी भजनसंध्या कार्यक्रम पार पडला. रविवारी सकाळी दीक्षा सोहळा समारंभ होणार आहे.