अवघ्या पाच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालला नाशिक जिल्ह्याचा कारभार!
By अझहर शेख | Published: March 15, 2023 05:16 PM2023-03-15T17:16:44+5:302023-03-15T17:16:59+5:30
जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारीही जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरलेला दिसून आला.
नाशिक : जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार चालविणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कारभार अवघ्या पाच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.१५) चालविण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचा कार्यालयातील कामकाजाला चांगलाच फटका बसला. अक्षरश: तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयांच्या दरवाजांचे कुलूप उघडून आतमधील दिवे, पंखे सुरू करण्याची वेळ आल्याचे चित्र बघावयास मिळाले.
जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारीही जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरलेला दिसून आला. तलाठी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या सर्वच महसूल कार्यालयांमधील वर्ग तीन आणि वर्ग चारचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यामुळे नायब तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचे सर्व अधिकारी त्यांच्या दालनात बसून होते. दैनंदिन कामकाजाचा गाडा कर्मचाऱ्यांअभावी पुढे सरकलाच नाही.
यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तालुका व गाव पातळीवरून येणाऱ्या नागरिकांना पदरी निराशा घेऊन परतावे लागले. कर्मचारी नसल्याने अधिकाऱ्यांनाही टेबलावर फायली आणून देणार कोण? असा प्रश्न पडला होता. यामुळे काहींनी प्राधान्यक्रमाने जी कामे आवश्यक आहे, त्या फायली स्वत: घेत टेबलावर ठेवून कामकाज सुरू केले. विविध कारणांसाठी विविध प्रकारचे दाखले काढणे, तलाठी कार्यालयात सातबारा उताऱ्यापासून शेतीशी संबंधित अन्य नोंदी घेणे, पिकांचे पंचनामे व तत्सम सर्वच कामे यामुळे ठप्प झाले आहेत.
एकूण कर्मचारी संपाचा परिणाम जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच शाखांमध्ये पहावयास मिळाला. सामान्य प्रशासन शाखा, महसूल शाखा, टंचाई शाखा, गृह शाखा, पुरवठा विभाग, निवडणूक शाखा, खनिकर्म विभाग, ग्रामपंचायत शाखेसह सर्वच शाखांमध्ये सन्नाटा पसरलेला होता. याशिवाय तहसील कार्यालयांमध्ये देखील याच शाखांशी संबंधित कामकाज चालते. त्यामुळे तेथील कामकाजही पुर्णपणे ठप्प झाल्याचे पहायला मिळाले.
आकडेवारी
एकूण अधिकारी, कर्मचारी - १,२४१
संपामध्ये सहभागी कर्मचारी - १०७१
रजेवर असलेले कर्मचारी - ३६
कर्तव्यावर हजर अधिकारी - १३४
कर्तव्यावर हजर कर्मचारी - ०५