'या' ठिकाणी शिवसेनेला पुन्हा सत्ता आणण्याचे मोठे आव्हान कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 02:50 PM2022-03-15T14:50:17+5:302022-03-15T14:58:20+5:30
शैलेश कर्पे सिन्नर - गेल्या पाच वर्षात सिन्नर पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत राहिल्याने पाच वर्षे शिवसेनेने एकमताने कारभार सांभाळला. गेल्या ...
शैलेश कर्पे
सिन्नर - गेल्या पाच वर्षात सिन्नर पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत राहिल्याने पाच वर्षे शिवसेनेने एकमताने कारभार सांभाळला. गेल्या पाच वर्षात पंचायत समितीत शिवसेनेने केलेले काम आणि आता विरोधकांचा वाढता विरोध पाहता आगामी काळात पंचायत समितीत शिवसेनेला पुन्हा सत्ता आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने तात्कालीन आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या नेतृत्त्वाखाली बहुमत मिळविले होते. त्यावेळी माणिकराव कोकाटे भाजपात होते. शिवसेनेचे ८ तर भाजपचे ४ सदस्य विजयी झाले होते. त्यामुळे बहुमताच्या जोरावर शिवसेनेने पाच वर्षे सत्ता उपभोगली. या काळात शिवसेनेने सर्वच्या सर्व सदस्यांना पदाधिकारी बनविण्यात यश मिळवले. पाच वर्षाच्या काळात शिवसेनेने पाच जणांना सभापती तर तीन जणांना उपसभापती पदाची खुुर्ची दिली. यावेळी सर्वच्या सर्व आठ सदस्यांना पदाधिकारी करण्यात शिवसेनेला यश मिळाले व त्यातून त्यांचा एकोपा व पक्षनेतृत्त्वाची पकड दिसून आली.
पाच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या सुमन बर्डे, भगवान पथवे, शोभा बर्के, रोहिणी कांगणे व संगीता पावसे यांना सभापतीपदाची खुर्ची मिळाली तर वेणूताई डावरे, जगन्नाथ भाबड व संग्राम कातकाडे यांना उपसभापतीपदी विराजमान होण्याची संधी मिळाली. या पाच वर्षात शिवसेनेत एकजूट दिसून आली. तर माणिकराव कोकाटे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या चारही सदस्यांनी राष्ट्रवादीची वाट धरून आपली एकी दाखवून दिली. शिवसेनेने जशी पाच वर्षात एकी दाखवली तशीच विरोधी चारही सदस्यांनीही एकी दाखवून कोकाटे यांनी पाठराखण केली. पंचायत समितीत आज मितीस वाजे-सांगळे गटाचे आठ तर आमदार माणिकराव कोकाटे गटाचे चार सदस्य आहेत. विशेष म्हणजे पाच वर्षात सत्ताधारी शिवसेनेचे आठही सदस्यांना सभापती किंवा उपसभापती म्हणून काम करण्याची संधी दिली.