पिंपळगावी बंद घरात माजी कर्मचाऱ्याचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 01:51 AM2022-05-28T01:51:56+5:302022-05-28T01:52:53+5:30
पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसचिव अशोक नथू बागुल (वय ६०) यांचा कुलूपबंद असलेल्या राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे पाच दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. घरातून येत असलेल्या दुर्गंधीने या घटनेचा उलगडा झाला. त्यांची वाहनेही गायब असल्याने घटनेचे गूढ वाढले आहे.
पिंपळगाव बसवंत : येथील शरदचंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसचिव अशोक नथू बागुल (वय ६०) यांचा कुलूपबंद असलेल्या राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे पाच दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. घरातून येत असलेल्या दुर्गंधीने या घटनेचा उलगडा झाला. त्यांची वाहनेही गायब असल्याने घटनेचे गूढ वाढले आहे.
बाजार समितीचे माजी उपसचिव अशोक नथू बागुल यांच्या पत्नी माहेरी गेल्या होत्या. त्या माहेरून परतल्यानंतर घरांमधून दुर्गंधी येत असल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी नातेवाइकांना आणि स्थानिक पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बंद दरवाजाचे कुलूप तोडले असता घरात बागुल यांचा मृतदेह आढळला. बागुल यांचा मृत्यू पाच ते सहा दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, बागुल यांचा बंद घरात अशा पद्धतीने मृतदेह आढळल्याने संशय व्यक्त होत आहे. घटनेच्या प्राथमिक तपासात बागुल यांची एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहन देखील गायब असल्याने घटनेचे गूढ वाढले आहे.
अशोक बागुल हे शास्त्रीनगर भागात स्वतःच्या बंगल्यात वास्तव्यास होते. त्यांची पत्नी आक्काबाई गेल्या काही दिवसांपासून वाहवा (ता. साक्री) येथे माहेरी गेल्या होत्या. त्या शुक्रवारी (दि. २७) दुपारी १२ वाजता घरी परतल्यावर त्यांना बंगल्याला कुलूप आढळून आले. तसेच दरवाजातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी त्यांचे दीर टिकराम बागुल यांना याची माहिती दिली. घटनास्थळीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे करीत आहेत.
बागुल यांचा मृत्यू संशयास्पद....
अनेक दिवसांपासून बागुल यांची पत्नी माहेरी गेली होती. त्या माहेरून आल्यावर बागुल यांचा बंद घरात दुर्गंधी येईपर्यंत अशा पद्धतीने मृत्यू होणे तसेच त्यांची एक मोटारसायकल आणि सेंट्रो गाडी गायब होणे यामुळे घटनेचे गूढ वाढले आहे.