कोचरगावच्या ‘त्या’ मुलीचा मृतदेह अखेर सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 01:52 AM2022-07-16T01:52:18+5:302022-07-16T01:52:37+5:30
दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथून चार दिवसांपूर्वी पुरात वाहून गेलेली सहा वर्षीय मुलगी विशाखाचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. उत्तरीय तपासणी करून मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथून चार दिवसांपूर्वी पुरात वाहून गेलेली सहा वर्षीय मुलगी विशाखाचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. उत्तरीय तपासणी करून मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या मंगळवारी (दि. १२) दहा वाजता सहा वर्षीय विशाखा बुधा लिलके ही आपल्या काकासोबत नदीवरील कोल्हापूर पॅटर्न बंधाऱ्यावरून प्रवास करत असताना पुराचा वेग वाढल्याने काका-पुतणी दोघेही वाहून गेले. काका भोलेनाथ हा पोहून बाहेर आला पण विशाखा सापडली नाही. दिंडोरी येथील तहसीलदार पंकज पवार यांनी तत्काळ त्याचदिवशी कोचरगाव येथे घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार कर्मचाऱ्यांना तपासकामाबाबत सूचना दिल्या. शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक गायकवाड तसेच तलाठी वैशाली निकुंभ हे परिसरात शोधकार्यावर लक्ष देत तळ ठोकून होते. दोन दिवस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सहकार्याने शर्थीचे प्रयत्न केल्यावरही पाण्यात विशाखा सापडली नाही. नदीला पूर असल्याने सर्वत्र शोध घेण्यात आला. अखेर गुरुवारी (दि. १४) रात्री आठ वाजता शोधमोहीम थांबविण्यात आली. शुक्रवारी (दि. १५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आळंदी धरणाच्या फुगवट्यात देवराम लिलके यांना मृतदेह तरंगताना दिसला. हा मृतदेह बाहेर काढून दिंडोरी तालुक्यातील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून कोचरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.