बोलावणं आलं... १८ जानेवारीपासूनच होणार प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ !
By धनंजय रिसोडकर | Published: January 15, 2024 07:09 PM2024-01-15T19:09:27+5:302024-01-15T19:10:35+5:30
गुरुजींना अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासकडून निमंत्रित करण्यात आले आहे.
नाशिक : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लाची प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार असली तरी या शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा विधीचा प्रारंभ १८ जानेवारीपासूनच होणार आहे. या प्राणप्रतिष्ठेच्या पूजनासाठी नाशिक शहरामधून दोन तर त्र्यंबकेश्वरमधून एक अशा तीन वेद शास्त्र संपन्न गुरुजींना अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासकडून निमंत्रित करण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील ३५५ साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण असून महाराष्ट्रातून एकूण ८८९ जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये ५३४ विशेष निमंत्रित आहेत. त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर ख्यातकीर्त व्यक्तींचा समावेश आहे. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्ल यजुर्वेदाच्या प्रयाेगातील धार्मिक विधींनी होणार आहे. त्यासाठी गुरुजी बुधवारी (दि. १७) नाशिकहून अयोध्येला पाहोचणार आहेत.
असा रंगणार प्राणप्रतिष्ठा सोहळा
ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना काशीचे आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ते मूळचे महाराष्ट्रातील, मात्र अनेक पिढ्यांपूर्वी काशीला स्थलांतरित झालेले विद्वान आहेत. या प्रतिष्ठापना विधीचा प्रारंभ मूर्तीचा जलाधिवास, पुष्पाधिवास, अन्नाधिवास हा सर्व सोहळा १८ जानेवारीपासूनच प्रारंभ होणार आहे. त्याशिवाय नवकुंडात्मक याग प्रतिष्ठा तसेच अन्य प्राणप्रतिष्ठेचे धार्मिक विधी पार पडणार आहेत. प्रत्यक्षात २२ तारखेला दुपारी १२:३० वाजेच्या मुहूर्तावर पूर्णाहूती आणि मूर्तीची स्थापना असा सोहळा पार पडणार आहे.