नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचा बंद मागे; उद्योग मंत्री सामंत यांची मध्यस्थी
By संजय पाठक | Published: June 2, 2023 09:23 AM2023-06-02T09:23:43+5:302023-06-02T09:24:09+5:30
बेळे यांच्या कारखान्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन
नाशिक- उद्योजकांची संघटना असलेल्या निमा म्हणजेच नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कारखान्यावर 21 मे रोजी करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेला औद्योगिक बंद मागे घेण्यात आला आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले आहेत त्यामुळे उद्योजकांनी उद्योग बंद करू नये असे आवाहन उद्योगमंत्री सामंत यांनी केले होते. त्यांना प्रतिसाद देत निमाने पुकारलेला बंद मागे घेतला आहे.
निमाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला भाजप अंतर्गत वादाची झालर होती. 19 मे रोजी निमा पॉवर प्रदर्शनाच्या उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी भाजप आमदार सीमा हिरे या धक्का लागून खाली पडल्या त्यानंतर त्या निघून गेल्या. त्यानंतर भाजप मधील सीमा हिरे समर्थकांनी बेळे यांच्या विरोधात निषेध मोहीम सुरू केली होती. त्यातच 21 मे रोजी बेळे यांच्या कारखान्यावर हल्ला झाला होता. त्यामुळे हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी निमाने बंद पुकारला होता. मात्र नाशिक मधील उद्योजकांच्या संघटनांमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले होते.