हंडामोर्चाचा इशारा देताच विहिरीची खोदाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 12:08 AM2022-05-10T00:08:56+5:302022-05-10T00:09:46+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पुंगटवाडी व मिलनवाडी यासह काही गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने श्रमजीवी संघटनेने १० मेपर्यंत पाण्याचे टँकर गावात ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पुंगटवाडी व मिलनवाडी यासह काही गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने श्रमजीवी संघटनेने १० मेपर्यंत पाण्याचे टँकर गावात पोहोचले नाहीत, तर थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर रिकामे हंडे घेऊन गावातील महिला पायी चालत येतील, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर जिल्हा परिषदेचे प्रशासन हलले असून, दोन जेसीबी लावून विहीर खोदण्याचे काम सोमवारी (दि.९) सुरू करण्यात आले.
पाच- सहा दिवसांपूर्वीच श्रमजीवी संघटनेतर्फे भगवान मधे यांनी तहसीलदार यांच्यासह पंचायत समिती कार्यालयाला पत्र देऊन पाणीटंचाईकडे लक्ष वेधले होते. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे श्रमजीवी संघटनेने येत्या १० मेपर्यंत पाणीप्रश्न न सुटल्यास गावातील महिला रिकामे हंडे घेऊन पायी चालत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन करतील, असा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत लागलीच दोन जेसीबी लावून विहीर खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. तसेच रोहिले, मुरंबी, वेळे येथेही टँकर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांत पुंगटवाडी व मिलनवाडी येथे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल त्यामुळे जि.प.नाशिक येथे दि.१० मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर धडकणारा मोर्चा रद्द करण्यात आला असल्याचे श्रमजीवी संघटनेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तोपर्यंत टँकरने पाणी
सोमवारी तत्काळ मुळेगाव येथे विस्तार अधिकारी पवार, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सूर्यवंशी आणि ग्रामसेवक यांनी मुळेगाव गाठले आणि तत्काळ विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केले. जोपर्यंत काम सुरू आहे तोपर्यंत त्या वाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरू राहील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
फोटो- ०९ त्र्यंबकेश्वर वॉटर
०९ त्र्यंबक कोलाज