जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने इंधन कंपनी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा
By Sandeep.bhalerao | Published: January 2, 2024 02:14 PM2024-01-02T14:14:03+5:302024-01-02T14:14:24+5:30
केंद्राने तयार केलेल्या ‘हिट ॲन्ड रन’ कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक चालक संपावर गेले आहेत.
नाशिक: इंधन ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवमानावरही जाणवू लागला आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार, प्रवासी आणि गृहिणींना या संपाचा फटका बसला असल्याने नाशिक जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पाऊले उचलण्यात येत आहेत. पालकमंत्री दादा भूसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुनार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी इंधन कंपन्यांबरोबर मनमाड, पाणेवाडी येथे चर्चा सुरू केली आहे.
केंद्राने तयार केलेल्या ‘हिट ॲन्ड रन’ कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक चालक संपावर गेले आहेत. नाशिकमधील इंधन ट्रक चालकांनी सोमवार (दि.१) पासून पुकारलेल्या बंदमुळे कालपासून नाशिकमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहेत तर शालेय स्कूल व्हॅनलाही इंधन नसल्याने शालेय वाहतूकीवर परिणाम झाला. या बंदला खासगी बसचालक, कॅब, टॅक्सी चालकांनी देखील पाठींबा दिल्याने प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवत आहे.
जिल्ह्यात संपाचा हा परिणाम झाल्यामुळे पालकमंत्री दादा भूसे यांनी लवकरच यातून तोडगा निघेल असे आश्वासन नाशिककरांना दिले आहे. या परिस्थिीवर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पानेवाडी येथे पाठविण्यात आले असून तेथे ते ट्रक चालक संघटना, युनियन पदाधिकारी तसेच कंपनी प्रतिनिधींशी चर्चा करीत आहेत.