‘त्या’ जळीत हाडांचा ‘डीएनए’ अखेर पोलिसांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 01:41 AM2022-02-03T01:41:38+5:302022-02-03T01:41:56+5:30
मनपाच्या डॉ. सुवर्णा वाजे यांच्या जळीत मोटारीत पोलिसांना आढळलेल्या हाडांचा डीएनए चाचणी अहवाल अखेर आठवडाभरानंतर ग्रामीण पोलिसांना बुधवारी (दि.२) प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अहवालाविषयीची अधिक माहिती मिळू शकली नाही. यामुळे बेपत्ता वाजे प्रकरणाबाबत गुरुवारी (दि.३) पोलिसांकडून खुलासा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिक : मनपाच्या डॉ. सुवर्णा वाजे यांच्या जळीत मोटारीत पोलिसांना आढळलेल्या हाडांचा डीएनए चाचणी अहवाल अखेर आठवडाभरानंतर ग्रामीण पोलिसांना बुधवारी (दि.२) प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अहवालाविषयीची अधिक माहिती मिळू शकली नाही. यामुळे बेपत्ता वाजे प्रकरणाबाबत गुरुवारी (दि.३) पोलिसांकडून खुलासा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिकेच्या माेरवाडी सिडको येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत डॉ. सुवर्णा संदीप वाजे (३८, रा. कर्मयोगीनगर) या मंगळवारी (दि.२५) रात्रीपासून बेपत्ता झाल्या आहेत. त्यांच्या पतीने अंबड पाेलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दाखल केली आहे. मात्र, महामार्गालगत रायगडनगरजवळ वाजे यांची मोटार त्याच रात्री जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आल्याने खळबळ उडाली. गाडीच्या चेसिज क्रमांकावरून मोटार वाजे यांच्या मालकीची असल्याची खात्री पटली खरी मात्र मोटारीत मिळालेली जळालेली हाडे कोणाची? याचा उलगडा पोलिसांना होत नव्हता. वैद्यकीय चमूकडून ती हाडे महिलेची आहेत, इतकेच सांगण्यात आले होते. त्यामुळे डॉ. वाजे यांच्या वडिलांचा डीएनए नमुना संकलित करून पोलिसांनी हाडे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. या तपासणी अहवालाची पोलिसांना आठवडाभरापासून प्रतीक्षा होती. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी अहवाल प्रयोगशाळेकडून पोलिसांना देण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले. मात्र, या अहवालाबाबत फारशी माहिती पोलिसांनी अधिकृतपणे उघड केली नव्हती.
--इन्फो--
संदीप वाजेंची दोन ते अडीच तास चौकशी
डॉ. सुवर्णा वाजे यांचे वडील तसेच त्यांच्या भगिनी आणि रुग्णालयातील त्यांचे सहकारी तसेच पती संदीप वाजे यांचा जबाब ग्रामीण पोलिसांकडून नोंदविण्यात आला आहे. माहेरच्या नातेवाइकांनी दिलेल्या जबाबावरून आता पोलिसांनी तपासाला गती देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. वाजे यांचे पती संदीप वाजे यांची बुधवारी पुन्हा दोन ते अडीच तास पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान पोलिसांना असलेल्या काही संशयास्पद बाबी उघड झाल्याचेही बोलले जात आहे.