उमेदवाराच्या निशाणीची निवडणूक स्लीप वाटली, शांतिगिरी महाराजांच्या भक्तांना घेतले ताब्यात
By Suyog.joshi | Published: May 20, 2024 02:46 PM2024-05-20T14:46:26+5:302024-05-20T14:47:30+5:30
अंबड पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल
नरेंद्र दंडगव्हाळ, सिडको, नाशिक: सोमवारी सिडको भागात मतदान सुरू असताना रायगड चौक भागात नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या काही भक्तांनी त्यांच्या बादलीची निशाणी असलेल्या मतदान स्लीप मतदारांना वाटप केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन संबंधित भक्तांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल केला.
सिडकोत सोमवारी शांततेत मतदान सुरू असताना मतदारांना चिन्ह असलेलं स्लीप देता येत नसतानाही बादली या निशाणी घेऊन उभे असलेले अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचे भक्त मतदान स्लीप बादलीची निशाणी असलेल्या स्लीपांचे वाटप करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तात्काळ शांतिगिरी महाराजांचे भक्तगण भागवत निकम ( रा.चाळीसगाव), संदीप पाटील, विष्णू करवट, पांडुरंग सदगीर या चौघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी यांच्या तक्रारीनुसार अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.