शेतकऱ्याने 18 गुंठ्यात रताळ्याचे पीक घेतले, चारच महिन्यात 2 लाख कमावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 05:04 PM2022-03-02T17:04:19+5:302022-03-02T17:05:15+5:30
विशेष म्हणजे एका एका रताळाचे वजन थोडेथिडके नाही तर तब्बल साडेसहा ते सात किलोपर्यंत होते
नाशिक - जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील भरवीर येथील शेतकरी रघुनाथ जाधव यांनी लागवडीची पारंपारिक पद्धत बदलत वाफ्याऐवजी बेड पद्धतीने केवळ 18 गुंठे क्षेत्रात लागवड केली. यंदा त्यांनी रताळ्याच्या पिकातून लाखोंची कमाई केली. रघुनाथ या शेतकऱ्याला 4 ते 5 महिन्यात दोन लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले. शेती हा मान्सुन पावसाचा जुगार मानला जातो. मात्र, आधुनिक पद्धतीने आणि प्रयोगशील शेती केल्यास शेती हा नफा कमावून देणारा व्यवसाय असल्याचे रघुनाथ यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
विशेष म्हणजे एका एका रताळाचे वजन थोडेथिडके नाही तर तब्बल साडेसहा ते सात किलोपर्यंत होते. तसेच हा माल मनमाड मालेगाव येथील बाजारपेठांमध्ये विकला असून त्यांच्या या मालाला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल, वीस रुपये किलोचा दर मिळाला. रघुनाथ यांना अठरा गुंठ्यामध्ये सुमारे दहा टनांच्या आसपास उत्पन्न मिळाले. तसेच हा माल महाशिवरात्रीपूर्वीच जागोजागी विकला गेला. महाशिवरात्रीच्या उपवासाला रताळे मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. यामुळे या काळात रताळ्यांना चांगली मागणी असते हीच बाब लक्षात घेऊन भरवीर येथील शेतकरी रघुनाथ जाधव यांनी आपल्या घरा मागील 18 गुंठे क्षेत्रात चार महिन्यापूर्वी रताळ्याची लागवड केली होती.
या पिकाला संपूर्ण शेणखताचा आणि पोषक विद्राव्य खतांचा वापर केला त्यांना साधारण सात ते आठ हजार रुपये खर्च आला. या पिकाला पूर्ण होण्यासाठी चार ते पाच महिन्यात सरासरी लागते. तसेच या रताळ्याच्या मालाचा प्रकार पाहून शेतकरी आचार्यचकीत झाले व आजूबाजूलादेखील आम्ही हे लावू असा प्रकारची चर्चा होऊ लागली. यासंदर्भात शेतकरी रघुनाथ जाधव यांनीही काही शेतकऱ्यांना अधिकची माहिती दिली