रतनगडावर दुर्गप्रेमींची झुंबड वन कर्मचारी रोखणार; वन्यजीव विभागाकडून ‘वीकेण्ड’ला निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 08:29 AM2022-11-03T08:29:52+5:302022-11-03T08:30:02+5:30

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य

The forest staff will stop the crowd of fort lovers at Ratangad | रतनगडावर दुर्गप्रेमींची झुंबड वन कर्मचारी रोखणार; वन्यजीव विभागाकडून ‘वीकेण्ड’ला निर्बंध

रतनगडावर दुर्गप्रेमींची झुंबड वन कर्मचारी रोखणार; वन्यजीव विभागाकडून ‘वीकेण्ड’ला निर्बंध

Next

नाशिक : पावसाच्या विश्रांतीनंतर कारवी, सोनकीसारख्या रानफुलांचा रतनगडाला चढलेला साज... स्वच्छ निरभ्र आकाश अन् बहरलेली गर्द हिरवाई...बोचरी थंडी अन् कधी मंद, तर कधी मध्यम हवेची झुळूक अशा निसर्गरम्य वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी दुर्गप्रेमींसह निसर्गप्रेमी पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनगडावर वळू लागली आहेत. शनिवार, रविवारी येथे मोठी झुंबड उडत असल्यामुळे नाशिक वन्यजीव विभागाने आता निर्बंध घातले आहे. 

अहमदनगर-नाशिक जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या अकोले तालुक्यातील कळसुबाई अभयारण्यामधील रतनवाडी गावाजवळील रतनगडाचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. रतनगडाच्या पायथ्याशी हेमाडपंती शैलीचे श्री अमृतेश्वर महादेवर मंदिर आहे. रतनवाडी हे या गडाचे पायथ्याचे गाव. अभयारण्यातील भंडारदराजवळील वन नाक्यावरून या गडाकडे सशुल्क प्रवेश दिला जातो. वाटेत आजोबाचा डोंगर, पट्टागडदेखील लागतो. या गडाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, डाहाणू, पालघर या शहरांमधून, तसेच गुजरात राज्यातूनदेखील पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

हिवाळा सुरू होताच ‘वीकेण्ड’ला याठिकाणी गर्दी उसळू लागली आहे. यामुळे अनुचित घटना घडण्याची भीती व्यक्त होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रतनगडावर नाशिक वन्यजीव विभागाने पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतल्याचे वनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या सूचनांवरून शनिवार, रविवार व जोडून आलेल्या शासकीय सुट्यांच्या दिवशी रतनगडावर केवळ तीनशे पर्यटकांना सोडले जाणार आहे. तीनशे पर्यटक पूर्ण होताच वन्यजीव विभागाच्या मुतखेल प्रवेश नाक्यावरून प्रवेश बंद केला जाईल, असे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले. याबाबत भंडारदरा वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनाही याठिकाणी संरक्षण मनुष्यबळ वाढविण्याची सूचना करण्यात आली आहे. जेणेकरून होणाऱ्या गर्दीवर योग्यरीत्या नियंत्रण ठेवणे सोपे होईल आणि सर्वांना सुरक्षितरीत्या दुर्गभ्रमंतीचा आनंद घेता येईल, हा यामागील उद्देश असल्याचे रणदिवे म्हणाले.

प्रवरा नदीचे उगमस्थान!

अहमदनगरच्या घनचक्कर डोंगररांगेतील प्रवरा नदीचे उगमस्थान रतनगड आहे. रतनगडाची चढाई श्रेणी मध्यम स्वरुपाची आहे. गडाच्या पायथ्याला असलेल्या अमृतेश्वर मंदिरात दर्शन घेत दुर्गप्रेमी गडाची चढाई सुरू करतात. जंगलातून जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर वन्यजीव विभागाने बसविलेली शिडी लागते. शिडीवरून चढून गेल्यानंतर गडाचा पहिला दरवाजा लागतो. तेथून दोन वेगवेगळ्या वाटा नजरेस पडतात. उजवीकडच्या वाटेने गेल्यास एक गुहा लागते. डावीकडच्या वाटेने गेल्यास गडाच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत पोहोचतो, संपूर्ण गड बघण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागतो, असे दुर्गभटकंती करणारे अभ्यासक युगंधर पवार यांनी सांगितले.

Web Title: The forest staff will stop the crowd of fort lovers at Ratangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.