भूसंपादनाच्या भ्रष्टाचाराचे भूत भाजपच्या मानगुटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2022 12:13 AM2022-05-08T00:13:37+5:302022-05-08T00:25:56+5:30
केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचे लोण नाशिकपर्यंत पोहोचले आहे. नाशिक महापालिकेत भाजपची पाच वर्षे सत्ता होती. या सत्ताकाळातील गैरव्यवहारांची प्रकरणे शोधून कारवाईचा ससेमिरा लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालविलेला दिसतो आहे. छगन भुजबळ यांनी पालकमंत्री या नात्याने महापालिकेत जाऊन आढावा बैठक घेतली. आर्थिक स्थितीचे कारण देत भाजपच्या महत्त्वाकांक्षी योजना बाजूला ठेवण्याचे आदेश दिले. ८०० कोटींच्या भूसंपादनाचा विषय भुजबळ यांनी काढून त्याचा काय उपयोग झाला, याची माहिती घेण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आश्वासन दिले. भूसंपादनाच्या कार्यपद्धतीविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भूसंपादन हे टीडीआरच्या माध्यमातून होते. नाशिकमध्ये भलतेच काही घडल्याच्या तक्रारी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या मानगुटीवर भूत बसले आहे.
मिलिंद कुलकर्णी
केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचे लोण नाशिकपर्यंत पोहोचले आहे. नाशिक महापालिकेत भाजपची पाच वर्षे सत्ता होती. या सत्ताकाळातील गैरव्यवहारांची प्रकरणे शोधून कारवाईचा ससेमिरा लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालविलेला दिसतो आहे. छगन भुजबळ यांनी पालकमंत्री या नात्याने महापालिकेत जाऊन आढावा बैठक घेतली. आर्थिक स्थितीचे कारण देत भाजपच्या महत्त्वाकांक्षी योजना बाजूला ठेवण्याचे आदेश दिले. ८०० कोटींच्या भूसंपादनाचा विषय भुजबळ यांनी काढून त्याचा काय उपयोग झाला, याची माहिती घेण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आश्वासन दिले. भूसंपादनाच्या कार्यपद्धतीविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भूसंपादन हे टीडीआरच्या माध्यमातून होते. नाशिकमध्ये भलतेच काही घडल्याच्या तक्रारी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या मानगुटीवर भूत बसले आहे.
अखेर वाजले निवडणुकीचे पडघम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने पडघम वाजू लागले आहेत. निवडणुका कधी होणार, ओबीसी आरक्षणाशिवाय की आरक्षणासह यासंबंधी स्पष्टता अद्याप नसली तरी दोन-चार महिन्यांत निवडणुका होणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, नाशिक महापालिका आणि सटाणा, सिन्नर, येवला, चांदवड, नांदगाव व मनमाड या नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोरोनाकाळात दोन वर्षे विकासकामे ठप्प झाली होती. त्यामुळे विकासकामांच्या विषयावर महाविकास आघाडीने आता कुठे धडाका सुरू केला होता. एवढ्यात निवडणुका झाल्यास सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन म्हणून त्याकडे पाहिले जाईल. सोबतच आघाडीतील तीन पक्षांच्या परस्परांसोबतच्या संबंधाविषयी चर्चा होईल. हे नको असल्याने निवडणुका लांबविण्याकडे सरकारचा कल असल्याची टीका झाली होती. आता सोक्षमोक्ष होईल.
राष्ट्रवादीला सेना का नकोय ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाची कसोटी असते. परंतु, राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी म्हणून जो प्रयोग झाला आहे, त्या आघाडीची मात्र प्रत्येक निवडणुकीत कसोटी लागते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र दिसले होते. या वेळी त्यापेक्षा वेगळे काही दिसेल, असे वाटत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाशकात झालेल्या पक्षमेळाव्यात शिवसेनेशी आघाडी करण्यावरून पक्षात मतभिन्नता दिसली. ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले हे आघाडीच्या बाजूने तर गजानन शेलार, अपूर्व हिरे हे विरोधात होते. शिवसेनेवर भाजपशी मिलीभगत केल्याचा, राष्ट्रवादीला डावलल्याचा आरोप शेलार यांनी केला. मध्यंतरी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील आघाडीच्या चर्चेला वेग आला होता.
खिसा कापणारा मित्र आणि थोरात
निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मात्र यात कॉंग्रेस पक्षाची फारशी कुठे चर्चादेखील नाही. रमजान ईदच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी मालेगावात मेळावा घेतला. त्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात, अस्लम शेख हे उपस्थित होते. अल्पसंख्याक समाजाप्रती कॉंग्रेसच्या असलेल्या बांधिलकीच्या दृष्टीने हा मेळावा लक्षणीय ठरला. महापौर ताहेरा शेख यांच्यासह महापालिकेतील कॉंग्रेसचे बहुसंख्य नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्याने तसेही मालेगावात कॉंग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. थोरात यांनी या घडामोडींवर मार्मिक टिपणी करीत कॉंग्रेसजनांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. सोबत चालत असताना मित्राने आमचा खिसा कापला, या टिपणीने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आघाडीतील तिन्ही पक्षांच्या एकत्रित कामगिरीविषयी कॉंग्रेस पक्ष सावध भूमिका घेईल, असेच संकेत या टिपणीतून मिळतात. मालेगाव महापालिकेची मुदत १५ जून रोजी संपत आहे.
पुरस्कार सोहळ्यात रुसवे फुगवे
२०१७, २०१८ व २०१९ या तीन वर्षांच्या पुरस्कारांचा घाऊक वाटप कार्यक्रम नाशकात झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमासाठी आले होते. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील हे पुरस्कार यंदा देण्यात आले. कृषिमंत्री दादा भुसे यांच्यामुळे हा कार्यक्रम नाशकात झाला. पक्षाच्या मंत्र्यांच्या या देखण्या कार्यक्रमाला पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समक्ष उपस्थित नव्हते. ऑनलाईन हजेरी त्यांनी लावली, ही कार्यकर्त्यांना रुखरुख राहिली. अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनाही पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र, राज्यपालांच्या कथित विधानाचा निषेध करीत त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. हे कारण मात्र अनाकलनीय होते. बंधू त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी असतानाही ही भूमिका घेतली गेली. अर्थमंत्री असलेल्या पवार यांनी पुरस्कारांच्या रकमेत पुढील वर्षापासून पाचपट वाढ करण्याचे घोषित केले, पण हे पुरस्कार दरवर्षी कसे दिले जातील, हे बघायची गरज आहे.
येवल्यात घडले बेरजेचे राजकारण
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसृष्टीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने येवल्यात शक्तीप्रदर्शन जसे केले तसेच बेरजेचे राजकारण देखील केले. मुरब्बी राजकारणी असलेल्या भुजबळ यांनी हा कार्यक्रम घेऊन पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधकांची तोंडे बंद केली. उपमुख्यमंत्रिपदावरून अजित पवार व भुजबळ यांच्यात पूर्वीपासून संघर्ष होता, त्यामुळे दोघांमध्ये सलोख्याचे संबंध नसल्याची चर्चा कायम होत असे. भुजबळ यांच्या मतदारसंघात गेल्या आठ वर्षांपासून अजित पवार न आल्याने अशा चर्चांना बळ मिळत गेले. नाशिक जिल्ह्यात इतर तालुक्यांत पवार आले, पण येवल्यात आले नाही, हे उघड होते. पवार यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदारद्वय दराडे बंधू, माजी आमदार कल्याणराव पाटील, काँग्रेसचे स्थानिक नेते सगळ्यांना आवर्जून बोलावून सन्मान दिला. पवारांनीही दराडे बंधूंच्या निवासस्थानी भेट दिली. भुजबळ यांच्या बेरजेच्या राजकारणाचा हा परिपाक आहे. त्याचा पक्षाला देखील लाभ होईल.