कुटुंबीय अभ्यासावरून रागवले, मुलींनी घर सोडले; पोलिसांनी आठ तासात शोधले
By नामदेव भोर | Published: July 13, 2023 05:08 PM2023-07-13T17:08:02+5:302023-07-13T17:08:37+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलींना एकाच वेळी पळवून नेल्याची घटना घडल्याने याप्रकरणात कुटुंबियांच्या तक्रारींनुसार अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- नरेंद्र दंडगव्हाळ
नाशिक : आई अभ्यास करण्यासाठी रागावते तसेच मैत्रिणींना भेटू देत नाही, याचा राग मनात धरून एकाच शाळेतील तीन अल्पवयीन मुली घर सोडून निघून गेल्याची घटना बुधवारी (दि.१२) रोजी घडली होती, याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेून या अल्पवयीन मुलींना अवघ्या आठ तासातशोधून त्यांना पालकांच्या स्वाधिन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलींना एकाच वेळी पळवून नेल्याची घटना घडल्याने याप्रकरणात कुटुंबियांच्या तक्रारींनुसार अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी याबाबत तत्काळ दखल घेत मुलीचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार केली. या तीनही मुले एकाच शाळेतील व एकाच परिसरात राहणारे असून एक मुलगी नववी व दोन मुली दहावीत शिक्षण घेत आहे. त्यामुळे या तिन्ही मुली मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.
पोलिसांनी संशय असलेले सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात तिनही मुली नासिकरोड रेल्वे स्थानकातून जळगावकडे जाणाऱ्या गाडीत बसुन जातांना दिसल्या. त्यामुळे पोलिसांनी जळगाव रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही ही तपासले. त्यात तिन्ही मुली जळगाव येथून पुन्हा मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेत बसतांना दिसून आल्या. या कालावधित पोलिस मुलींचा शोध घेत असतांना संबधित मुलीनी कल्याण रेल्वे स्टेशनवरील एका प्रवाशाकडून फोन घेवुन त्यांच्या मैत्रिणीला फोन केला. त्याची माहिती घेत पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन तपासले. त्यात कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने अंबड पोलिसांनी कल्याण रेल्वे पोलिसांसोबत संपर्क साधला.
त्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांच्या मदतीने तिन्ही मुलींना तत्काळ ताब्यात घेवुन बाल कल्याण समिती समोर हजर केले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या आठ तासाच्या आत अल्पवयीन मुलींना पोलिसांनी शोधून काढल्याने मुलींच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, या तिन्ही मुलींना शोधण्याच्या कामगिरीत अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उप निरीक्षक संदिप पवार, नाईद शेख, पोलिस हवालदार नितीन राऊत, रविंद्रकुमार पानसरे, सचिन जाधव, पोलिस नाईक किरण देशमुख, विनायक घुले यांनी मोलाचीभूमिका बजावली.