सरकारची मदतीची घोषणा पण निधीअभावी अपघातग्रस्तांच्या शस्त्रक्रिया लांबल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 07:35 AM2023-01-17T07:35:37+5:302023-01-17T07:35:51+5:30
रुग्णांसह नातेवाईकांची घुसमट : रुग्णालयाच्या ‘माणुसकी’ची शासनाकडून परीक्षा
शैलेश कर्पे
सिन्नर : शुक्रवारी पहाटे सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन दहा साईभक्तांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. या सर्व जखमींवर शासकीय निधीतून उपचार करण्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती. मात्र चार दिवस उलटल्यानंतरही अपघातग्रस्तांच्या वैद्यकीय उपचारासाठी शासनाचा एक रुपयाचा सहायता निधी रुग्णालयाच्या प्रशासनाला प्राप्त झाला नाही. शासनाच्या निधी देण्याच्या दिरंगाईमुळे अपघातग्रस्तांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्याचे संतापजनक चित्र पाहायला मिळाले.
शुक्रवारी पहाटे अपघात झाल्यानंतर सर्व जखमींना सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पालकमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ सिन्नरला धाव घेऊन रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी जखमींवर शासकीय निधीतून मदत करण्याची घोषणा केली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
अपघात होऊन चार दिवस उलटून गेले आहे. मात्र शासनाच्या निधीतून जखमींच्या उपचारासाठी अद्याप एक रुपयाचाही निधी आलेला नाही. तरीही यशवंत रुग्णालयाच्या डॉक्टरांनी निधी येईल म्हणून २३ पैकी १३ रुग्णांना कोणतेही बिल न घेता डिस्चार्जही दिला. अजूनही १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
डॉक्टर देवमाणूस पण...
शासनाच्या निधीच्या दिरंगाईमुळे रुग्ण व नातेवाईक अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. काहींनी तर स्वखर्चातून डिस्चार्ज करण्याचीही तयारी केली होती. डॉक्टर चार दिवसांपासून एक पैसाही न मागता उपचार करीत असल्याने ते आमच्यासाठी देवमाणूस असल्याचेही रुग्णाच्या नाईवाईकांनी सांगितले. मात्र सहाय्यक निधी मिळण्यास उशीर होत असल्याने रुग्णांवरील ऑपरेशन लांबल्याचे चित्र रुग्णालयात दिसून आले.