नाशकात वाढला थंडीचा कडाका; ११.१अंश या हंगामातील नीचांकी तापमान
By अझहर शेख | Published: January 15, 2024 03:39 PM2024-01-15T15:39:49+5:302024-01-15T15:40:08+5:30
भारतीय हवामान खात्याकडून सोमवारपासून पुढे आठवडाभर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.१५) अचानकपणे थंडीचा कडाका वाढला. किमान तापमानात वेगाने घसरण झाल्याने या हंगामातील सर्वात नीचांकी११.१अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. आतापर्यंत किमान तापमान १२अंशापेक्षा खाली घसरले नव्हते. मागील तीन दिवसांत थेट सहा अंशांनी तापमान घसरल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना आता जाणवत आहे.
भारतीय हवामान खात्याकडून सोमवारपासून पुढे आठवडाभर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार रविवारी रात्रीपासूनच थंडी नागरिकांना जाणवू लागली होती. रात्री थंड वारे वेगाने वाहू लागल्याने सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान थेट ११.१अंशापर्यंत खाली आले. या हंंगामात पहिल्यांदाच इतके कमी किमान तापमान नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढताच नागरिकांकडून पुन्हा ऊबदार कपड्यांचा वापरावर भर दिला जाऊ लागला आहे. तसेच सकाळी व संध्याकाळी गोदाकाठावर व शहराजवळच्या खेड्यांत तसेच शहरी भागातील गावठाण परिसरातही शेकोट्यांचा आधार रहविाशी घेतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. हा संपुर्ण आठवडा थंडीचा राहणार आहे. यामुळे उबदार कपड्यांना मागणी वाढणार आहे.
आठवडाभरापूर्वी थंडी पुर्ण गायब झाल्याचा अनुभव नागरिक घेत होते. आता मात्र थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. यासोबतच वातावरणात उष्माही आहे. कारण दिवसभर ऊनही कडक पडत असून कमाल तापमान संध्याकाळी ३२ ते ३० अंशाच्या जवळपास स्थिरावत आहे. आठवडाभरापुर्वी ढगाळ हवामानासह किमान तापमानही १७.७अंशापर्यंत वाढलेले होते. या आठवड्यापासून वातावरणाची स्थितीमध्ये अचानक वेगाने बदल होत असून किमान तापमानाचा पारा घसरू लागला असून कमाल तापमानही २अंशांनी खाली आले आहे. आकाश निरभ्र राहत असून थंडीचा कडाका वाढू लागला आहे.