मतदान केंद्रात सुविधा पुरविण्याचा भार मुख्याध्यापकांवरही; संयुक्त बैठकीत निर्णय
By दिनेश पाठक | Published: April 16, 2024 05:04 PM2024-04-16T17:04:09+5:302024-04-16T17:05:15+5:30
नाशिक जिल्ह्यात मतदानाची तयारी जोमात
दिनेश पाठक, नाशिक: निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना विविध सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या संदर्भात शिक्षण विभागाची जिल्हास्तरीय बैठक झाली. मतदान केंद्रात निवडणूक आयाेगाच्या निर्देशानुसार सुविधा पुरविल्या आहेत की नाही, कोणत्या सुविधा आवश्यक वाटतात ते पाहण्याची जबाबदारी आता प्रशासनातील अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकांवरही निश्चित करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात मुख्याध्यापकांना मतदान केंद्रात सुविधा पुरविण्याबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. ९० टक्के मतदान केंद्र शाळांमध्येच असतात. त्या अनुशंगाने मुख्याध्यापकांना शाळेची भौगोलिक स्थिती व तेथील सुविधांसह शाळेतील तांत्रिक बाबींची माहिती असते त्याचाच विचार करून मतदारांना अधिक सुविधा पुरविल्या जाव्यात यासाठी मुख्याध्यापकांवर जबाबदारी सोपविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्या. त्यामुळे मुख्याध्यापकांना देखील अलर्ट रहावे लागणार आहे. त्यांच्या सोबतीला प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी असतीलच.
मतदान केंद्रात या सुविधा पुरविणार
प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, स्वच्छता गृह, दिव्यांग व गर्भवती महिला मतदारासाठी रॅम्प, व्हीलचेअर, वीज पुरवठा, हेल्पडेस्क, पुरेसा प्रकाश, सावली राहील याची काळजी घेण्यात येईल. याचा आढावा आता मुख्याध्यापकांनाही घ्यावा लागेल.