नाशकात आलेला ११० उंटांचा कळप तस्करी? पोलिसांचा अहवाल 'लोकमत'च्या हाती
By अझहर शेख | Published: May 8, 2023 02:06 PM2023-05-08T14:06:31+5:302023-05-08T14:06:58+5:30
मागील एक ते दीड महिन्यांपासून त्यांनी नाशिकच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला.
नाशिक - शहरातील तपोवनात तीन दिवसांपुर्वी दाखल झालेला शंभर उंटांचा कळपाने सर्वच अवाक् झाले अन् सरकारी यंत्रणाही खडबडून जागी झाली. कोणी म्हणे कत्तलीसाठी उंटांची तस्करी होत आहे, तर कोणी म्हणे हे उंट राजस्थानकडून तस्करीच्या इराद्याने नाशिकमध्ये आणले गेले तर काहींनी हैदराबादला कत्तलीसाठी पाठविण्याची तयारी असल्याचाही कयास सोशलमिडियावर लावला. मात्र या सर्व चर्चा निरर्थक व अफवा ठरत असल्याचे सटाणा पोलिसांनीपोलिस अधिक्षकांना दिलेल्या अहवालानंतर स्पष्ट होत आहे. उंटपालन करणारे लोक ‘मदारी’ म्हणून मागील २५ ते ३०वर्षांपासून नाशकातील तपोवनात वास्तव्यास असून त्यांच्या आधारकार्डांवरही येथील पत्ता असल्याचे अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे.
शहरामध्ये दाखल झालेले उंट हे राजस्थानमधून आल्याचा दावा सोशलमिडियाद्वारे काही लोकांकडून केला जात होता. मात्र, सटाणा पोलिसांनी बुधवारी (दि.३) पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांना उभा उंटांच्या माहितीबद्दल दिलेला अहवाल ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. हे सर्व उंट गुजरातमधील नर्मदा, तापी खोऱ्यातून सटाणा, देवळामार्गे नाशिक शहराकडे आले. कारण सर्व उंटपालक हे येथील तपोवन झोपडपट्टी, आडगाव मेडिकल कॉलेज परिसरात वास्तव्यास आहे. ते आपल्या ताब्यातील उंटांना चारण्यासाठी होळीच्या अगोदर गुजरातकडे गेले होते, असे अहवालात म्हटले आहे.
मागील एक ते दीड महिन्यांपासून त्यांनी नाशिकच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. पावसाळा सुरू होण्यापुर्वी त्यांना नाशिकमध्ये पोहचायचे होते. कारण, याठिकाणी त्यांची झोपडीवजा घरे आहेत, अशी नोंद सटाणा पोलिसांनी स्टेशन डायरीला असून अहवालातही नमूद केले आहे. त्यामुळे कत्तलीसाठी उंटांची तस्करी होत असल्याच्या चर्चेवर ग्रामिण पोलिसांच्या अहवालाने पुर्णविराम लागला आहे.
२९एप्रिलला सटाण्यात मुक्काम!
मागील महिन्याच्या २९तारखेला ३३उंटांना घेऊन ६पुरूष, ११ महिला, १५ लहान मुले असा संपुर्ण कबिला २उंटगाड्यांसह सटाणा शहरात मुक्कामी होता. दुसऱ्यादिवशी ३०एप्रिल रोजी त्यांचा दुसरा कबिला सटाण्यात ४९उंटांसह दाखल झाला. त्यासोबत ५पुरूष ७ महिला व १४ लहान मुले होती. या दोन्ही कबिल्यांची सटाणा पोलिसांनी नोंद घेऊन देवळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कंधाणे फाटा, पिंपळदर, मांगबारीमार्गे नाशिक शहराच्या दिशेने सोडले.
उंटांवरच भागते पोटाची भूक !
उंटपालनकर्ते हे मागील २५ ते ३० वर्षांपासून ‘मदारी’ म्हणून नाशिक शहरात वास्तव्यास असल्याचा पोलिसांचा अहवाल सांगतो. उंटांचे पालन करत त्याद्वारे खेळ करणे, लहान मुलांना उंटांवर बसून शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये तपोवन, गोदाकाठसारख्या प्रेक्षणिय ठिकाणी फेऱ्या मारत त्याचे १० ते २०रूपये घेणे आणि लग्नकार्यात नवरदेवाला बसण्यासाठी उंट भाडेतत्वावर देणे अशाप्रकारे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
होळीपुर्व सोडले नाशिक
उंट पालनकर्त्यांनी होळी सणाच्याअगोदर नाशिकमधून हरसूल, पेठ, नानापोंडा, वापीमार्गे ते गुजरातच्या दिशेने स्थलांतर केले होते. त्यानंतर तेथे वास्तव्य करत पुन्हा दीड महिन्यांपासून त्यांनी उंटांना घेऊन नाशिकच्या दिशेने परतीचा प्रवास पायी सुरू केला होता. हे सर्व तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमाजवळील साधुग्रामभागातील झोपडपट्टीकडे येत होते.
आधारकार्डांच्या प्रती घेऊन सोडले
सटाणा पोलिसांनी चौकशी करत संबंधितांच्या आधारकार्ड तपासून त्याच्या प्रतींसह मोबाइल क्रमांक नोंदवून घेऊन त्यांना नाशिकच्या दिशेने प्रवास करण्यास ‘ग्रीन सिग्नल’ दिला. ३३उंटांच्या कबिल्यासोबत शिवा मदारी सय्यद (३५,रा.तपोवन), गोलू मेहताव मदारी (दोघे रा.कुंभमेळा स्टॅन्ड, तपोवन), ४९ उंटांच्या कबिल्यासोबत सलमान सलीम सय्यद (२४,रा.तपोवन) अब्दुल सलीम सय्यद (२५रा.मेडिकल कॉलेजजवळ आडगाव), जमाल करीम सय्यद (४५,रा.तपोवन) यांचा समावेश होता, असे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे.