उड्डाणपुलांच्या विरोधातील खटल्याला आता जनहितचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2022 01:30 AM2022-01-26T01:30:25+5:302022-01-26T01:30:46+5:30
मायको सर्कल आणि उंटवाडी उड्डाणपुलाच्या निविदेतील अनियमितता आणि आणि नियम धाब्यावर बसवून राबविण्यात येत असलेल्या निविदेमुळे नाशिकककरांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मुद्दे जनहितार्थ असल्याचे ठरवत ही याचिका जनहितमध्ये परावर्तित करून मुख्य न्यायमूर्तींकडे चालवण्यासाठी वर्ग करण्याचा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. २५) दिला. त्यामुळे आता याचिकेत अन्य अनेक संबंधित पक्ष सहभागी होणार असून त्यांचा मार्गदेखील मेाकळा झाला आहे.
नाशिक : मायको सर्कल आणि उंटवाडी उड्डाणपुलाच्या निविदेतील अनियमितता आणि आणि नियम धाब्यावर बसवून राबविण्यात येत असलेल्या निविदेमुळे नाशिकककरांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मुद्दे जनहितार्थ असल्याचे ठरवत ही याचिका जनहितमध्ये परावर्तित करून मुख्य न्यायमूर्तींकडे चालवण्यासाठी वर्ग करण्याचा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. २५) दिला. त्यामुळे आता याचिकेत अन्य अनेक संबंधित पक्ष सहभागी होणार असून त्यांचा मार्गदेखील मेाकळा झाला आहे.
अर्थात आता दाखल केलेली जनहित याचिका ही कोणत्याही परिस्थितीत माघारी घेता येणार नसल्याचेदेखील अधोरेखित झाले आहे. त्यामुळे आता दोन्ही उड्डाणपुलांचे प्रकरण रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने मायको सर्कल आणि उंटवाडी येथे नियोजित उड्डाणपुलावरून सध्या वादंग सुरू असून यासंदर्भात भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पुलासाठी सिमेंटची ग्रेड एम ४० ऐवजी एम ६० करण्यात आली. त्यामुळे पुलाचे डिझाईनदेखील बदलावे लागणार आहे. त्यामुळेच नवीन निविदा मागवण्याची गरज असताना त्या ठेकेदारांकडून कामे देऊन रक्कम वाढवून देण्याचे घाटत असल्याचा शहाणे यांचा आक्षेप होता. यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती गौतम एस. पटेल आणि माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी (२५ जानेवारी) सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्ता मुकेश शहाणे यांनी दाखल केलेल्या याचिकेत कोणत्याही प्रकारे वैयक्तिक स्वारस्य दिसत नाही. त्यामुळे प्रबंधकांनी ही जनहित याचिका म्हणून परावर्तित करावी आणि सुयोग्य खंडपीठासमोर सादर करावी, असे नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्ता शहाणे यांच्या वतीने ॲड. राहुल मोटकरी यांनी काम बघितले.
इन्फो..
महापालिकेचा पाय खेालात
नाशिक महापालिकेच्या विरोधातील याचिका आता जनहित याचिकेत परावर्तित झाल्याने प्रशासनासमोरील आणि पुलाचे समर्थन करणाऱ्यांसमेार अडचणी वाढल्या आहेत. जनहित याचिका दाखल झाल्यानंतर त्यावरील सुनावणी लांबल्यास पुलाला विलंब अधिकच वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरील अर्थवाद आणि श्रेयवादही फसणार आहे.
इन्फो...
उड्डाणपुलासंदर्भातील जनहित याचिकेवर सुनावणी होणार असतानाच आता याच खटल्यात सहभागी करून घेण्यासाठी अन्य विरोधी घटकांचीदेखील तयारी सुरू झाली आहे. मनसेच्या वतीनेदेखील आता याचिकेत सहभागी होेण्याची तयारी असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी सांगितले.