बिबट्यालाही लागली द्राक्षे गोड, घटनेमुळे शेतकरी कुटुंब अवाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 04:26 PM2023-03-03T16:26:50+5:302023-03-03T16:31:14+5:30
नाशिकच्या आंबट गोड द्राक्षांनी परदेशातदेखील अनेकांच्या जिभेवर गोडी निर्माण केली आहे. आता मानवी वस्तीत राहणारा बिबट्यादेखील द्राक्ष खात असल्याचे आढळून आले आहे.
भगवान गायकवाड -
दिंडोरी (नाशिक) : कोल्ह्याला झाडावर चढून द्राक्ष खाता येत नाही, त्यामुळे तो द्राक्ष बागेत कोकलतो, त्यावरून एक म्हण पडली आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट..., पण बिबट्याने द्राक्ष बागेत झेप घेत ओरबाडून द्राक्षाची चव चाखली आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंब अवाक झाले आहे.
दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे मागील वर्षभरापासून दोन बिबटे व दोन पिल्ले गावाच्या उत्तर बाजूस असलेल्या डोंगर परिसरात राहत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहेत. नाशिकच्या आंबट गोड द्राक्षांनी परदेशातदेखील अनेकांच्या जिभेवर गोडी निर्माण केली आहे. आता मानवी वस्तीत राहणारा बिबट्यादेखील द्राक्ष खात असल्याचे आढळून आले आहे. बिबट्याने चक्क दोन ते तीन द्राक्ष घड खाल्ल्याचे दिसून आले. भाऊसाहेब पुंडलिक मोरे यांच्या शेतात द्राक्ष काढणीसाठी तयार झाली आहेत.
नेहमीप्रमाणे त्यांचे बंधू अशोक पुंडलिक मोरे बागेतून जवळच असलेल्या परशराम बाबा यांच्या समाधीच्या पूजेसाठी जात असतात. यावेळी बागेतून ओरडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडताच त्यांनी खाली बसून बघितले तर बागेत बिबट्या दूरवर आढळून आला. बिबट्या आपल्या पंजाने बागेच्या वेलीवर ओरखडत होता व द्राक्ष खाली पाडत होता. यावेळी मोरे यांनी जवळच असलेल्या घरामधील व्यक्तींना आवाज देताच बिबट्याने धूम ठोकली. आता दिवसाढवळ्यादेखील बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. बिबट्याने पाच-सहा दिवसांपूर्वी रत्नगडजवळ राहत असलेले कचरू पवार व सुनील गांगुर्डे यांच्या घराजवळून कुत्र्याला ओढत नेऊन ठार केले. मीराबाई गांगुर्डे यांनी सकाळी ८.३० वाजता बिबट्या घरासमोरच्या शेतातून जात असताना बघितला.
पिंजरे वाढविण्याची मागणी
आठ दिवसांपूर्वी मेंढपाळ ताराचंद ढेपले हे रात्री कांद्याच्या शेतात मुक्कामी होते. परिसरात असणाऱ्या बिबट्याने रात्री १.३० वाजेच्या सुमारास शेळ्या-मेंढ्याच्या कळपात घुसून हल्ला केला. मेंढ्यांच्या आवाजाने ढेपले हे जागे झाले व कोकरू ठार करून बिबट्याने बोकड पकडल्याचे दिसून आले. बोकड वाचवण्यासाठी ढेपले यांनी आरडाओरडा केला. मात्र, त्यानंतर बिबट्या पळून गेला; पण बिबट्याच्या दहशतीने रात्री शेतात शेतकरी जीव मुठीत घेऊन आपल्या पिकाला पाणी देतात. आता तर दिवसाढवळ्या बिबट्या दर्शन देत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबटे पकडण्यासाठी पिंजरे वाढवण्याची मागणी शिंदवड ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.