बिबट्याच्या बछड्याचे घटले होते हिमोग्लोबिन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 01:37 AM2022-07-04T01:37:05+5:302022-07-04T01:37:36+5:30
पळसे शिवारातील मळे भागात भटक्या अत्यावस्थ अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या तीन ते चार महिन्यांच्या बछड्याला आठवडाभरापूर्वी वनविभागाने रेस्क्यू केले होते. पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. बछड्याला पुरेशा प्रमाणात पौष्टिक अन्न न मिळाल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमालीचे घटल्याचे निदान पशुवैद्यकांनी केले होते.
नाशिक : पळसे शिवारातील मळे भागात भटक्या अत्यावस्थ अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या तीन ते चार महिन्यांच्या बछड्याला आठवडाभरापूर्वी वनविभागाने रेस्क्यू केले होते. पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. बछड्याला पुरेशा प्रमाणात पौष्टिक अन्न न मिळाल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमालीचे घटल्याचे निदान पशुवैद्यकांनी केले होते.
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील पळसे शिवारात असलेल्या मळे भागात बिबट्यांचा मुक्तसंचार आढळतो. या भागात बिबट्याच्या दर्शनाच्या तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या तक्रारी वनखात्याला नेहमीच प्राप्त होत असतात. दि. २५ जून रोजी पळसे शिवारातील एका मळ्याच्या परिसरात झाडीझुडपांमध्ये अत्यावस्थ अवस्थेत साधारणत: तीन ते चार महिन्यांचा बिबट्याचा बछडा निपचित पडलेला शेतकऱ्यांना दिसला. शेतकऱ्यांनी त्वरित वनखात्याला माहिती कळविली. माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बछड्याला रेस्क्यू केले होते.
पशुवैद्यकांकडून आवश्यक ते उपचार केल्यानंतर बछड्याला पश्चिम वनविभागाच्या वन्यप्राणी देखभाल निवारा केंद्रात निगराणीखाली ठेवण्यात आले. तेथे वनरक्षकांसह वन्यजीवप्रेमींकडून सुश्रूषा करण्यात आली. बछडा सुदृढ झाल्यानंतर पशुवैद्यकांनी तपासणी करत नैसर्गिक अधिवासात मुक्ततेसाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये वनरक्षकांनी बछड्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक गावकऱ्यांनी दाखविलेले प्रसंगावधान व वनखात्याची तत्परता यामुळे बछड्याला जीवनदान लाभल्याने वन्यजीवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.