एटीएम केंद्रातून यंत्र फेकले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 01:42 AM2022-06-15T01:42:37+5:302022-06-15T01:43:19+5:30

गावात असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम केंद्र मंगळवारी (दि.१४) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दोन मोटारींमधून आलेल्या चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. सुदैवाने एटीएम यंत्रातील रोकड शाबूत राहिली; मात्र चोरट्यांनी केंद्रात तोडफोड करत नुकसान केले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे

The machine was thrown from the ATM center on the road | एटीएम केंद्रातून यंत्र फेकले रस्त्यावर

एटीएम केंद्रातून यंत्र फेकले रस्त्यावर

Next
ठळक मुद्देरोकड शाबूत : विल्होळी गावात चोरट्यांचा प्रताप

नाशिक : गावात असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम केंद्र मंगळवारी (दि.१४) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दोन मोटारींमधून आलेल्या चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. सुदैवाने एटीएम यंत्रातील रोकड शाबूत राहिली; मात्र चोरट्यांनी केंद्रात तोडफोड करत नुकसान केले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नाशिक तालुका पोलिसांकडून सीसीटीव्हीफुटेजवरून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबईकडून नाशिककडे येताना वेशीवरचे गाव म्हणून विल्होळी ओळखले जाते. विल्होळीनंतर नाशिक शहराची हद्द सुरू होते. विल्होळी गावात प्रवेश करतानाच कमानीजवळ महाराष्ट्र बँकेची विल्होळी शाखा कार्यान्वित आहे. या बँकेला लागूनच त्यांचे एटीएम केंद्र आहे. या केंद्रात पहाटेच्या सुमारास एक बोलेरो, स्कॉर्पिओ अशा मोटारींमधून दोन ते तीन तरुण उतरले. त्यांनी तोंडावर फडके बांधलेले होते. या चोरट्यांनी केंद्रात जाऊन दरवाजाची काच फोडली. यानंतर स्वत:जवळ असलेल्या साधनसामुग्रीद्वारे एटीएम यंत्रही जमिनीवरून उपसून केंद्रातून बाहेर आणले; मात्र हे यंत्र वाहनात टाकून नेण्याऐवजी चोरट्यांनी रस्त्यावर फेकून देत पोबारा केला. यावेळी त्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी यंत्र रस्त्यावर पडलेले व केंद्रात सर्वत्र काचा विखुरलेल्या होत्या. पोलिसांनी त्वरित याबाबत महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांंना माहिती दिली. दिवस उजाडताच अधिकारी, कर्मचारी तेथे पोहचले. त्यांनी यंत्रात असलेल्या रोकडची तपासणी करत ती शाबूत असल्याची खात्री पटविली. चोरट्यांनी तोंडाला फडके बांधलेले असल्यामुळे त्यांची ओळख पटलेली नाही; मात्र सीसीटीव्ही फुटेज व अन्यमार्गाने पोलीस तपास करत आहेत.

--इन्फो---

‘सीसीटीव्ही’द्वारे माग काढण्याचा प्रयत्न

पोलिसांकडून दिवसभर महामार्गावरील टोलनाके व आजूबाजूच्या हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात होते. चोरट्यांनी केवळ केंद्राची तोडफोड केली व एटीएम यंत्र काढून बाहेर रस्त्यावर आणून टाकले, यामधील राेकड चोरी झालेली नाही, असे सारिका आहिरराव यांनी सांगितले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The machine was thrown from the ATM center on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.