मुहूर्त ठरला! या दिवशी होणार अयोध्येत श्रीरामांची स्थापना; भाविकांना दर्शनासाठी होणार खुले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:15 AM2022-05-18T10:15:04+5:302022-05-18T10:15:35+5:30
अयोध्येत श्रीराम जन्मभूमी न्यासाचे बांधकाम जोमाने सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अयोध्येत श्रीराम जन्मभूमी न्यासाचे बांधकाम जोमाने सुरू आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये नूतन गर्भगृहात श्रीरामांची स्थापना होईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली. भगवान श्रीराम सर्वांचे आहेत, त्यामुळे कुणीही त्यांचे दर्शन घेऊ शकतो. मात्र, त्यात राजकीय हेतूऐवजी श्रद्धाभाव असावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
गिरी महाराज दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. मंगळवारी माध्यमांसोबत संवाद साधताना ते म्हणाले, श्रीरामांचे दर्शन कुणीही घेऊ शकतो. रावण जरी दर्शन घेऊन इच्छित असेल आणि प्रभू श्रीरामचंद्र त्याचे स्वागत करणार असतील तर विरोध करणारे आपण कोण? दर्शनासाठी कोणालाही विरोध करू नये. मात्र, त्यात राजकीय हेतूऐवजी श्रद्धा असावी. श्रीराम यांच्यावर आमची खरोखर श्रद्धा आहे, असे त्यांनी लोकांना सांगायला हवे.