मतदार यादीत नाही नाव, उडाली आमची धावाधाव!
By Suyog.joshi | Published: May 20, 2024 01:51 PM2024-05-20T13:51:03+5:302024-05-20T13:51:20+5:30
सिडकोतील मोरवाडी शाळेजवळ जवळपास सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बूथ लावले आहेत.
नाशिक (सुयोग जोशी)- सिडकोतील काही मतदार यादीत मतदारांचे नाव नसल्याने अनेक जणांना सकाळपासून धावाधाव करावी लागत आहे. नेहमीप्रमाणे या निवडणुकीत याद्यांमध्ये नाव नसल्याने अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली तर अनेकांना तुमची नावे इतर मतदान केंद्रात असल्याचे सांगण्यात येत होते. सिडकोतील मोरवाडी शाळेजवळ जवळपास सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बूथ लावले आहे, त्यामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मतदार निवडणूक आयोगाने दिलेल्या अँपच्या मदतीने स्वताची नावे शोधत होती तर तरुण मतदार ज्येष्ठ नागरिकाना मदत करत होते तर कुठे पोलिसही मार्गदर्शन करत होते. उन्हाच्या तीव्रतेने मतदान झाल्यानंतर अनेक ज्येष्ठांना सावलीत बसविण्यात येत होते. सिडकोतील उत्तमनगर कोलेजमध्य मोठी रांग लागल्याने अनेकांनी सावलीत जाऊन बसण्याला पसंती दिली.
मतदारांना डिजिटल स्लीपा
नाशिकरोड (मनोज मालपाणी) - राजकीय पक्षाकडून मतदारांना डिजिटल पद्धतीने मोबाईलवर मतदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या मतदानाच्या स्लीपा पाठविण्यात आल्या. त्यामुळे मतदार ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर जाताना त्यांना शंभर मीटरच्या अलीकडे पोलीस व कर्मचाऱ्याकडून अडविण्यात येऊन मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे मतदारांना पुन्हा मतदान केंद्राबाहेरील बूथ वर जाऊन स्लिपा घ्याव्या लागत होत्या.
मोबाईल बंदी केली जात असल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. तसेच अनेक मतदारांकडे मोबाईल मध्ये डिजिटल ओळखपत्र होते. मोबाईल बंदीमुळे मतदारांना ओळखपत्र घेण्यासाठी पुन्हा घरी जाण्याची पाळी येत होती. तसेच मतदान यादी मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची तक्रार देखील मतदार ठीकठीकाणाच्या मतदान केंद्र बाहेरील बुधवर कार्यकर्त्यांकडे करत होते.