आव्हान अंगावर घेण्याच्या धाडसामुळेच राज्यात नवीन सरकार-एकनाथ शिंदे
By नामदेव भोर | Published: October 21, 2022 05:30 PM2022-10-21T17:30:36+5:302022-10-21T17:32:00+5:30
सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक- मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजी राजे छत्रपती आझाद मैदानावर बसले होते. तेव्हा सर्वांचीच धावपळ उडाली आणि अशात आव्हान अंगावर घेण्याची वेळ आल्यामुळे मला पुढे करण्यात आले. परिस्थिती अंगावर घेण्याची वेळ आली की नेहमी मलाच पुढे केले जात होते. अशीच आव्हाने अंगावर घेण्याच्या धाडसामुळे राज्यात नवीन सरकार आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
नाशिक विभागीय कार्यालयाच्या आवारात सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाचे शुक्रवारी (दि.२१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आमदार दिलीप बनकर, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले. देवयानी फरांदे,नरेंद्र दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, जिल्हाधिकारी डी गंगाथरण, आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. राज्याचे प्राधान्यक्रम शिक्षण, आरोग्य, कृषी, शेतकरी विकासाला असल्याचे नमूद करतानाच राज्यातील मराठा, कुणबी मराठा, कुणबी, आणि मराठा कुणबी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सारथीचे काम सुरू आहे. मध्यंतरी दोन ती वर्षाच्या कालावधीत हे काम थांबले असले तरी आता समाजातल्या दीन दुबळ्यांसाठी, वंचितांसाठी, शोषितांसाठी त्यांच्या कल्याणासाठी,मराठा तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी सारथीच काम पुन्हा रुळावर आणण्यासाठी हवी ती मदत आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मराठा समाजाला मागास सिद्ध करण्याचे प्रयत्न
सारथीच्या उद्घाटन सोहळ्यात संभाजी राजे छत्रपती यांनी नाशिक विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनामुळे सरकारडून अपेक्षित काम होत असल्याचे समाधान व्यक्त केले. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे यासाठी सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी राज्य सरकारने पुन्हा सर्वेक्षण करण्याची तसेच सारथीचे काम ग्रामीण भागातही पोहचविण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर मराठा आरक्षणासाठी उप समितीच्या माध्यमातून आवश्यक ती पूर्तता करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले