दि न्यू इन्स्टिट्यूटचा अक्षय्य पुरस्कार अणुशास्त्रज्ञ काकोडकर यांना जाहीर
By संकेत शुक्ला | Published: January 18, 2024 03:55 PM2024-01-18T15:55:52+5:302024-01-18T15:56:37+5:30
संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षापासून सुरू झालेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत ७ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. समाजात विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.
नाशिक : येथील नामांकीत दि न्यू एज्यूकेशन इन्स्टिट्यूटतर्फे दिवंगत बाबासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा अक्षय्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मिवभूषण डॉ. अनिल काकोडकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी दिली. कालिदास कलामंदिर येथे दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणासंदर्भात आयोजीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, सेक्रेटरी हेमंत बरकले, रमेश महाशब्दे, सरला तायडे, उमेश जाधव आदि उपस्थित होते. संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षापासून सुरू झालेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत ७ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. समाजात विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.
शाळेतील समितीच यासाठी व्यक्तीनी निवड करते. यंदा भारताने चांद्रयानसह इतर क्षेत्रात केलेल्या अतुलनिय कामगिरीमुळे विज्ञान क्षेत्रातील व्यक्तीला हा पुरस्कार द्यावा असा संस्थेचा मानस असल्याने डॉ. काकोडकर यांची निवड केल्याचे वैशंपायन यांनी सांगीतले. २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. यापुर्वी हा पुरस्कार समाजसेवक डॉ. विकास आमटे, धावपटू कविता राऊत, द. म. सुकथनकर, पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर, सचिन पिळगावकर, प्रशांत दामले यांना देण्यात आला आहे.
कोण आहेत डॉ. अनिल काकोडकर?
डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. त्यासोबतच भारतामधील महत्त्वपूर्ण वैज्ञानिक अनु संशोधन केंद्राचे प्रमुखपद सांभाळण्याची जबाबदारी डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हाती होती. याशिवाय काकोडकर यांची थोरियम इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक अशी विशेष ओळख आहे. काकोडकर यांचे भारताच्या अणुऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या योगदानामुळे देशाने काकोडकर यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे सर्वश्रेष्ठ मांडले जाणारे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.