विद्यार्थी वाढले भारी, शिक्षणाधिकारी आयुक्तांच्या दारी
By Suyog.joshi | Published: July 4, 2024 11:19 AM2024-07-04T11:19:16+5:302024-07-04T11:19:26+5:30
महापालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या वर्षी जूनअखेर नवीन सुमारे २७३० विद्यार्थी वाढले असले तरी ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे पाहिले तर तब्बल ७० गुरूजींची कमतरता असून १५ मुख्याध्यापकांच्या जागाही रिक्त आहेत.
नाशिक - महापालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या वर्षी जूनअखेर नवीन सुमारे २७३० विद्यार्थी वाढले असले तरी ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे पाहिले तर तब्बल ७० गुरूजींची कमतरता असून १५ मुख्याध्यापकांच्या जागाही रिक्त आहेत. बुधवारी शिक्षणाधिकारी तथा प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना शिक्षकांच्या भरतीबद्दल अवगत केले.
शहरातील ८२ शाळा स्मार्ट झाल्याने शाळेचे रुपडे बदलले असून साडे सहाशे वर्गखोल्या डिजिटल बनल्या आहेत. नुकत्याच मनपाच्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यातून तिसऱ्या क्रमंकाचा बहूमान मिळाला. दर्जेदार शिक्षनामुळे मनपा शाळांकडे पाहण्याचा दुष्टीकोन बदलू लागला आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७३० विद्यार्थी वाढले आहेत.
आपल्या पाल्याला इथेच प्रवेश मिळावा. यासाठी प्रयत्न करत आहेत. पालिकेचा शिक्षण विभाग, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे यश असल्याचे म्हणायला हरकत नाही. खासगीकरणामुळे पालिकेच्या शाळा मागे पडल्या होत्या. या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेणार की, नाही असे चित्र होते. परंतु मनपाच्या शाळांची मरगळलेली अवस्था दूर झाली आहे. शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटल करण्यात या शाळांना यश आले आहे.
सेवानिवृत्त शिक्षक घेण्याबाबत आयुक्तांशी चर्चा
शिक्षणाधिकारी तथा प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याशी बुधवारी शिक्षकांच्या भरतीबद्दल चर्चा केली. पवित्र पोर्टलच्या भरतीबद्दल तांत्रिक अडचणी येत असल्याने सध्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होवू नये यासाठी सध्या तरी सेवानिवृत्त शिक्षकांना घेता येऊ शकते का याबद्दल विचार विनिमय केला. त्यावेळी आयुक्तांनी यावर लवकरच विचार करून निर्णय घेऊ असे सांगितले. कारण २०२३ च्या संचमान्यतेनुसार शासनाने अद्याप कोणतीही भरती केली नाही. नवीन भरती करणे हे शासनाच्या अखत्यारित असल्याने त्याचे अधिकार स्थानिक स्तरावर महापालिकेला नाही. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना भरती करण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या वाढलेली विद्यार्थी संख्या कौतुकास्पद आहे. असे असले तरी नवीन आलेले विद्यार्थी इतरत्र कुठेही जाऊ नये यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याबाबत विचार-विनिमय सुरू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
-बी. टी. पाटील,
शिक्षणाधिकारी, मनपा