मालकाने कोरे चेक दिले, मॅनेजरने १० कोटी लाटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 12:47 IST2023-10-13T12:46:37+5:302023-10-13T12:47:02+5:30
सागर विश्वनाथ सुरळकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालकाने कोरे चेक दिले, मॅनेजरने १० कोटी लाटले
नाशिक : मद्यविक्रीच्या तीन दुकानांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फेरफार करत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या संशयित हेमचंद्र चौधरी याने संगनमताने आर्थिक व्यवहारांत फेरफार केली व १० कोटी २९ लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सागर विश्वनाथ सुरळकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरळकर हे नंदुरबारचे आहेत. संशयित चौधरीवर शहरातील तीन दारू विक्री दुकानांच्या व्यवहारांची जबाबदारी होती. त्यासाठी संबंधित दुकान चालकांनी कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी करीत ते चौधरीच्या ताब्यात दिले होते. मात्र, त्याने १० कोटी २९ लाख रुपये स्वत:सह कुटुंबातील चौघा सदस्यांच्या बँक खात्यावर वर्ग करून रक्कम हडपली. व्यवहार सविस्तर न देता व्यवसायासाठी झालेला खर्च, खरेदी व विक्री याची माहिती देऊन दिशाभूल केली.
चौघांविरुद्ध गुन्हा -
चौधरीने तीनही दुकानांच्या खात्यातून स्वत:सह कुटुंबीयांच्या खात्यात पैसे वर्ग केले. एप्रिल २०१३ ते मार्च २०२३ या काळात हा प्रकार झाला. चौधरीसह पत्नी संशयित रत्ना, मुलगा नीलेश, मुलगा मयूर व सून मिनल मयूर चौधरीविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.