नाशिकसह राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला पुन्हा मुदतवाढ
By संजय पाठक | Published: May 2, 2023 11:45 AM2023-05-02T11:45:30+5:302023-05-02T11:46:00+5:30
सध्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची कामे अद्यापही सुरू असून यामध्ये प्रामुख्याने गावठाण विकास प्रकल्प आणि प्रोजेक्ट गोदा या दोन महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे
संजय पाठक
नाशिक- केंद्र शासनाने नाशिक सह राज्यातील सर्व स्मार्ट सिटी अभियानाला एक वर्षाची मुदतवाढ दिली असून तसे पत्र जारी केले आहे. १ मे च्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या पत्रानुसार आता स्मार्ट सिटी कंपनीची मुदत ३० जून २०२४ पर्यंत राहणार आहे. अर्थात अशा प्रकारची मुदतवाढ काम देताना कोणतेही नवीन आर्थिक दायित्व किंवा नवीन कामांना परवानगी देता येणार नाही. जी कामे यापूर्वी मंजूर किंवा प्रस्तावित आहेत तीच कामे पूर्ण करण्याचे निर्देशही या पत्रामध्ये केंद्र शासनाने दिले आहेत.
सध्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची कामे अद्यापही सुरू असून यामध्ये प्रामुख्याने गावठाण विकास प्रकल्प आणि प्रोजेक्ट गोदा या दोन महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे महत्त्वाची मानली आहेत. याशिवाय गोदावरी नदीवर असलेल्या होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेट बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पूर नियंत्रण करणे सुलभ होणार आहे. स्मार्ट पार्किंग, स्मार्ट स्कुलही कामेही मंजूर आहेत.