नाशिकच्या तरुणाईने कलागुणांनी वेधले नरेंद्र मोदी यांची जिंकले मन
By अझहर शेख | Published: January 12, 2024 05:06 PM2024-01-12T17:06:26+5:302024-01-12T17:06:48+5:30
राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १२) नाशिकमधील तपोवनात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले
नाशिक : गोंधळी, आदिवासी, भांगडा, गरबा अशा वेगवेगळ्या लोकनृत्यांचे दमदार सादरीकरण.. ढोलवादनाचा निनाद.. वारकरी विद्यार्थ्यांकडून होणारा टाळ-मृदंगाचा गजर.. शाळकरी मुलांचे लेझीम नृत्य.. शरीरसौष्ठवपटूंचे प्रदर्शन.. यशवंत व्यायामशाळेच्या मल्लखांबपटू शाळकरी मुला-मुलींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांद्वारे नाशिकच्या तरुणाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले. फुलांनी सजविलेल्या खुल्या जीपमधून मोदी यांनी रोड-शो करत तरुणाईच्या सादरीकरणाला दाद दिली.
राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १२) नाशिकमधील तपोवनात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने मोदी यांचा निलगिरी बाग हेलिपॅड ते साधुग्राम प्रवेशद्वार असा दोन किमीचा रोड-शो कडेकोट बंदोबस्तात सकाळी १०:३० ते ११ वाजेदरम्यान पार पडला. छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या एकतर्फा सर्व कलापथके, नागरिकांसाठी जागा आरक्षित होती. दुभाजकाच्या विरुद्ध बाजूने संपूर्ण मार्ग मोदी यांच्या कॅन्वॉयसाठी राखीव ठेवण्यात आला होता. त्या मार्गावर सुरक्षा व्यवस्थेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नव्हता.
गोंधळी नृत्य
पंचवटी येथील स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कूलच्या १८ विद्यार्थिनींनी गोंधळी नृत्य सादर करत मने जिंकून घेतली. या मुलींनी दोन दिवस गोंधळी नृत्याचा कसून सराव करत रोड शोदरम्यान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दमदार पारंपरिक नृत्याचे मराठमोळ्या वेशात सादरीकरण केले.
आदिवासी पारंपरिक नृत्य
त्र्यंबकेश्वर येथील हेदुली पाडा येथील कोंबडनाच कलापथकाने पारंपरिक आदिवासी नृत्याचे सादरीकरण केले. पायात घुंगरू, हातात दांडीया घेत या कलापथकाने आदिवासी नृत्य सादर केले. तसेच, साक्री येथून आलेल्या आदिवासी कलापथकानेसुद्धा आपली कला सादर केली.
भांगडा, गरबा नृत्याने वाढविली रंगत
स्वामी विवेकानंद स्कूल व सायक्लोन डान्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत भांगडा नृत्याचे सादरीकरण केले. सुमारे २०पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या समूह लोकनृत्यामध्ये सहभाग घेतला. तसेच, शहरात वास्तव्यास असलेल्या कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या १०० पेक्षा जास्त महिला, पुरुषांनी एकत्र येत पारंपरिक गरबा नृत्याचे सादरीकरण केले.