'मला पाणी प्यायचे आहे, सांगून पोलिसाला दिला धक्का; चोरटा पोलीस ठाण्यातून फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 05:21 PM2023-12-19T17:21:39+5:302023-12-19T17:22:53+5:30
या घटनेने इंदिरानगर पोलिसांसह गुन्हे शोध पथकाची धावपळ उडाली. त्याचा दिवसभर पोलिस शोध घेत होते; मात्र तो उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही.
संजय शहाणे, नाशिक : चोरीच्या एका गुन्ह्यात अटक केलेला संशयित आरोपी विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे हा पोलिस ठाण्यातील एका पोलिसाला धक्का देत संरक्षक भिंतीवरून उडी घेऊन पळून गेला. मंगळवारी (दि. १९) सकाळी ही घटना इंदिरानगर पोलिस ठाण्यात घडली. या घटनेने इंदिरानगर पोलिसांसह गुन्हे शोध पथकाची धावपळ उडाली. त्याचा दिवसभर पोलिस शोध घेत होते; मात्र तो उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे (२०,रा. म्हसोबा मंदिराजवळ साठेनगर, वडाळा गाव) यास गुन्हे शोध पथकाचे युनिट २चे उपनिरीक्षक संजय पाडवी यांच्या पथकाने ताब्यात घेतले होते. सोमवारी (दि.१८) इंदिरानगर पोलीस ठाण्यात विशाल याला आणण्यात आले. त्यानंतर गुन्हा तपास करणारे रात्रपाळीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर देवरे यांनी नऊ वाजता संशयित तीनबोटे यास ताब्यात घेऊन गुन्ह्यासंदर्भात चौकशी सुरू केली.
रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याला अटक दाखविण्यात आली. त्यानंतर त्यास अंबड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये टाकण्यासाठीची तयारी इंदिरानगर पोलिसांनी सुरू केली होती. हे लक्षात आल्यानंतर मंगळवारी संशयित विशाल याने पोलिसांकडे पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली. त्यास देवरे यांनी पोलीस ठाण्याच्या मागील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पाण्याच्या कुलरजवळ घेऊन गेले. देवरे हे त्याला पाणी देत असताना त्याने जोराचा धक्का त्यांना दिला. काही क्षणांत पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेत धूम ठाेकली. पोलिसांनी तातडीने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. इंदिरानगर पोलीस ठाण्यात देवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे दोन पथक त्याच्या मागावर असून लवकरच त्याला ताब्यात घेण्यास यश येईल, असे पगार यांनी सांगितले.