तिघांना ऑनलाइन गंडा घालत तब्बल ११ लाख ४३ हजार रूपये लुटले
By दिनेश पाठक | Published: February 2, 2024 07:21 PM2024-02-02T19:21:06+5:302024-02-02T19:21:15+5:30
सोपे टास्क देत पाडले माेहजालात; नंतर झाली फसवणूक
नाशिक : सोपे टास्क देऊन गलेलठ्ठ पैसे कमविण्याचे आमिष देत २१ वर्षीय तरूणासह अन्य दाेन जणांना तब्बल ११ लाख ४३ हजार रुपयांत ऑनलाइन गंडा घालण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहजालात अडकलेल्या तरुणांनी सायबर पोलिस ठाणे गाठत फिर्याद नाेंदविली. आपल्या अकाऊंटमधील पैसे संपल्याने दाेघांनी तर चक्क ऑनलाइन पैसे उसनवार मागितले. परंतु तेही पैसे ते गमावून बसले. शहरातील तिघाही फिर्यादींना एकाच टोळीने वेगवेगळ्या नंबरवरून फसविल्याचे निष्पन्न झाले आहे.
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार रोजच घडत असल्याने सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. शिवम दयानंद सूर्यवंशी (२१) रा.ताज हेरीटेजजवळ, कृष्णाई नगर याने फिर्याद दाखल केली आहे. शिवम याच्यासह अंकिता राय व मिथुन दाते यांना मोबाइलवर टेक्स्ट तसेच इस्टाग्रामवर ऑनलाइन गेमिंगचा तसेच त्या माध्यमातून सोपे टास्क जिंकत लाखो रूपये कमवा असा मेसेज आला. त्याला फिर्यादी भुलले. त्यांनी मेसेजच्या लिंकवर क्लिक करताच साइट ओपन झाली. अन् त्यांना सुरुवातीस दोन सोपे टास्क देण्यात आले.
त्यात शिवम व अन्य दाेघेही जिंकले. त्या बदल्यात त्यांच्या बँक खात्यावर बक्षीस स्वरूपात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे नंतर तीन दिवस मोबाइल क्रमांक ८६०२७१०८८७ या व्हॉट्सॲपवर तसेच त्यांच्या टेलिग्रामवर तीन ठिकाणाहून वेळाेवेळी मेसेज आले. त्यात काही टास्क देण्यात आले. प्रिपेड, प्रीमियम टास्कचे नाव सांगत मग संशयित सायबर आरोपींनी दिलेल्या अकाऊंटवर पैसे भरण्यास सांगितले. डॅश बोर्डावर टास्क पूर्ण झाले की पैसे बक्षीस म्हणून मिळत असल्याचे या तिघांनाही दाखविण्यात आले, परंतु प्रत्यक्ष त्यांच्या अकाऊंटवर बक्षिसाचे पैसे पडतच नव्हते. पहिले फक्त दोन टास्क जिंकल्याचे पैसे पडले होते. ते पाहून फसवणूक झालेल्या तिघांनी एकएक टास्क जिंकण्यासाठी पैसे टाकले. पण जिंकल्याचे लाखे रूपये आपल्या अकाऊंटला जमाच झाले नाही. तर त्या बदल्यात आपणच पैसे देऊन बसलो असल्याचे लक्षात येताच तिघांनी सायबर पोलिस स्टेशन गाठले.
फसवणुकीचा आकडा असा
अंकिता रॉय यांची ५ लाख १६ हजार, मिथुन अशोक दाते यांची ३ लाख २४ हजारात तर शिवम सूर्यवंशी याची ३ लाख तीन हजार रूपये अशी मिळून ११ लाख ४३ हजार रुपयांना फसवणूक झाली. मागील महिन्यात एकाची ९४ लाखात तर एकाची ४२ लाखात अशीच फसवणूक झाली होती. त्यानंतर ही सर्वात मोठी ऑनलाइन फसवणूक आहे. त्यामुळे कोणीही अनोळखी नंबरहून आलेल्या नंबरवरचे ऑनलाइन गेमिंग किंवा टास्कचे मेसेज ओपन करू नये, असे आवाहन सायबर क्राइम विभागाने केले आहे.