१५ गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुंडाची कोयत्याने हत्या; नाशिकच्या अंबडमध्ये हल्ल्याचा थरार

By अझहर शेख | Published: October 29, 2022 10:12 AM2022-10-29T10:12:59+5:302022-10-29T10:15:35+5:30

शुक्रवारी मध्यरात्री घडली ही घटना.

The thrill of the attack in Nashik s Ambad criminal killed crime news maharashtra | १५ गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुंडाची कोयत्याने हत्या; नाशिकच्या अंबडमध्ये हल्ल्याचा थरार

१५ गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुंडाची कोयत्याने हत्या; नाशिकच्या अंबडमध्ये हल्ल्याचा थरार

googlenewsNext

नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये एका सराईतावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचत अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवार (दि.२८) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान तन्मय मनोज गोसावी व आकाश अनिल साळुंखे हे महालक्ष्मी नगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर बसले होते. त्याच वेळी अक्षय उत्तम जाधव हा त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला. यावेळी त्याचे वाद झाले असता संशयित तन्मय गोसावी याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अक्षय जाधव यांच्या डोक्यात वार केला. दरम्यान या ठिकाणाहून अक्षय समोर असलेल्या घराच्या एका बाल्कनीत पळाला. दरम्यान गोसावी व साळुंखे हे त्याच्या मागे पळाले व पुन्हा एकदा अक्षयला त्या ठिकाणी त्यांनी गाठले आणि त्याच्या डोक्यात पुन्हा कोयत्याने जबरी वार केले. तसेच त्याच्या डोक्यात दगड उचलून टाकला. दरम्यान, या ठिकाणी असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी राहिवाशाने अक्षयला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांकडे असलेले हत्यार बघून भीतीने त्याने पळत पोलीस ठाणे गाठले.

दरम्यान त्याने अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली असता अंबड पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी जखमी अक्षय जाधव यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून पोलीस गाडीत बसवून जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी अक्षयला तपासून त्यास मृत घोषित केले. दरम्यान या प्रकरणी संशयित मारेकरी तन्मय गोसावी व आकाश साळुंखे हे फरार होण्याच्या तयारीत असताना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने त्यांना सापळा रचून तात्काळ अटक केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार आदींसह गुन्हेशोध पथक व पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

नुकताच सुटला होता जामीनावर
या घटनेतील मृत अक्षय उत्तम जाधव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यांसारखे १५ गुन्हे दाखल असून नुकतेच त्याला व त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांच्याकडून पोलिसांनी ३२ तोळे सोने व साडेदहा लाख रुपये रोख असा घरफोडीचा मुद्देमाल जप्त केला होता. अक्षय हा ८ ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती कारागृह नाशिक येथून जामिनावर सुटला होता. त्याच्या विरोधात यापूर्वी अंबड पोलीस ठाण्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. यापूर्वी २६ डिसेंबर २०२० ते २५ जून २०२१ पर्यंत सहा महिन्याच्या कालावधीसाठी त्याला जिल्ह्यातून हद्दपार देखील करण्यात आले होते.

Web Title: The thrill of the attack in Nashik s Ambad criminal killed crime news maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.