जावयाची गाढवावरून वाजतगाजत धिंड; अशी आहे 'या' गावची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 04:23 PM2022-03-23T16:23:45+5:302022-03-23T16:26:21+5:30

सहजासहजी जावई मिळणे अतिशय अवघड होते, तरीही हार मानतील ते वडांगळीकर कसले? याचा प्रत्यय नेहमीच येतो. तत्पूर्वी, जावई शोधाबरोबरच गाढवाचाही शोध घेण्याचे आव्हान युवकांपुढे ठाकले होते.

The tradition of riding a son-in-law on a donkey in Vadangali at Nashik | जावयाची गाढवावरून वाजतगाजत धिंड; अशी आहे 'या' गावची परंपरा

जावयाची गाढवावरून वाजतगाजत धिंड; अशी आहे 'या' गावची परंपरा

googlenewsNext

नाशिक- सुपाचे बाशिंग... लसणाच्या मुंडावळ्या...  कांदा व फाटक्या चपलांचा हार..., अशा पेहरावात सिन्नर तालुक्यातील वंडागळी येथे जावयाची गाढवावर बसवून धिंड काढण्यात आली. शिमग्याच्या सणास जावयाची गाढवावर बसवून धिंड काढण्याची प्रथा वडांगळीकर गेल्या सुमारे पावणे दोनशे वर्षांपासून जोपासत आहे.

या वर्षीही ही परंपरा टिकविण्यासाठी युवकांची धडपड सुरु  होती. तथापि, सहजासहजी जावई मिळणे अतिशय अवघड होते, तरीही हार मानतील ते वडांगळीकर कसले? याचा प्रत्यय नेहमीच येतो. तत्पूर्वी, जावई शोधाबरोबरच गाढवाचाही शोध घेण्याचे आव्हान युवकांपुढे ठाकले होते. पण युवकांनी दोन्ही मोहिमा फत्ते केल्या.

येथील बाळासाहेब यादव खुळे यांचे चितेगाव (नाशिक) येथील जावई दौलत बाजीराव भंबारे हे नाशिक येथील खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्यांना सिन्नर तालुक्यात प्लॉट खरेदी करायचा असल्याचा मानस यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. या गोष्टीचा फायदा घेत शिवसेना जिल्हा उपप्रमुख दीपक खुळे यांनी भ्रमनध्वनीवर त्यांना संपर्क करत हिवरगाव शिवारात प्लॉट विक्रीसाठी असून तुम्ही तो बघण्यासाठी या, असा बनाव केला. यानंतर भंबारे तो प्लॉट बघण्यासाठी येणार असल्याने त्यांचे मेव्हूणे गिरीश खुळे यांच्यासह प्रदीप खुळे, शशिकांत खुळे, दाऊद खुळे, धनंजय खुळे, मंगेश देसाई  आदी युवक हिवरगाव येथे गेले.  एवढे युवक पाहून त्यांच्या मनात शंकेची पाल चुटपुटली.




वडांगळीच्या युवकांनी त्यांना धिंडीसाठी गळ घातली. प्रारंभी ते राजी नव्हते पण धिंडीसाठी त्यांची मनधरणी करण्यात आली.  अशा रितीने जावयाचा शोध संपला. असे असले तरी वडांगळी व परिसरात एकही गाढव उपलब्ध नसल्याने धिंडीसाठी गाढव उपलब्ध करण्याचे आव्हान युवकांपुढे उभे राहिले. अखेर निफाड तालुक्यातील सायखेडा येथे काही युवकांना गाढव आणण्यासाठी पाठविण्यात आले. पंधराशे रुपये बिदागी देऊन गाढव आणण्यात आले.  मिरवणूकीसाठी डी. जे. बोलविण्यात आला. रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बस स्थानक परिसरातून धिंढीस प्रारंभ करण्यात आला. जावयायावर गल्लोगल्लीतून अक्षता टाकण्यात येत होत्या.

सदरील गाढव हे लहान असल्याने त्यास जावयाचा भार पेलणे अशक्य झाले. त्यानंतर भंबारे यांना काही युवकांनी  आलटून- पालटून खांद्यावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. गावातून धिंड मिरवल्यानंतर यजमान असलेल्या बाळासाहेब खुळे  यांच्या घरी सदर मिरवणूक थांबविण्यात आली. त्यानंतर पाच सुवासिनी बोलावून त्यांच्या हस्ते जावयास अभ्यंग स्नान घालण्यात आले. यावेळी लग्नात म्हटले जाते तशी गीते या सुवासिनींनी म्हटले. अभ्यंग स्नान झाल्यानंतर जावयास पुरणपोळीचे गोड भोजन देत. नवीन कपडे व जोडे देत आदरातिथ्य करण्यात आले. यावेळी अश्विनी खुळे, कल्याणी खुळे, रुपाली खुळे, प्रियंका खुळे, ज्योती कुलथे, सोनल क्षत्रिय आदी महिला उपस्थित होत्या.

Web Title: The tradition of riding a son-in-law on a donkey in Vadangali at Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक