मोहदरी घाटात बर्निग बसचा थरार, कोल्हापूरला जाणारी लक्झरी जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:18 PM2022-05-13T23:18:43+5:302022-05-13T23:19:28+5:30
एमआयडीसी व सिन्नर नगरपरिषद अग्निशमन बंबांनी घटनास्थळी पोहचून आग विझविली, सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
सिन्नर (नाशिक)-: नाशिकहून कोल्हापुरकडे निघालेली खासगी प्रवासी बस मोहदरी घाटात तांत्रिक बिघाडामुळे पेटल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस उभी करुन प्रवाशांना बसमधून उतरविल्याने मोठी जीवीत हानी टळली. तथापि, बस पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.
एमआयडीसी व सिन्नर नगरपरिषद अग्निशमन बंबांनी घटनास्थळी पोहचून आग विझविली. श्रीहरी दत्तात्रय कुलकर्णी, रा. म्हसरुळ, नाशिक हे खासगी लक्झरी बस (क्र. एमएच 09, पी.बी. 3069) नाशिकहून कोल्हापुरकडे भाविकांना घेऊन जात होते. बसमध्ये अंदाजे 30 ते 35 प्रवाशी होते. नाशिकहून निघालेली बस रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास मोहदरी घाटात आली असता, बसला आग लागल्याचे चालक कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करुन प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगितले. प्रवाशी बसमधून सुखरुप बाहेर आल्यानंतर कुलकर्णी यांनी सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या आग्नीशामक दलाला तसेच एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर दोन्ही आग्नीशामक बंब तात्काळ घटनास्थळी पोहचले व काही वेळात आग विझविण्यात आली. चालक कुलकर्णी यांनी प्रसंगावधान दाखविल्याने बसमधील सर्व प्रवासी सुखरुप बचावले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढल्याने दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांना आगी लागण्याच्या घटना तालुक्यात घडत आहेत. गेल्या महिन्यात पांढुर्ली घाटात धावत्या चारचाकीला आग लागून चालकाचा मृत्यू झाला होता. दुसर्याच दिवशी नांदूरशिंगोटे रस्त्यावर चारचाकीने् पेट घेऊन आगीत भस्मसात झाली होती. एप्रिल महिन्याच्या शेवटी मोहदरी घाटात कार पेटण्याची तसेच सोमवारी गुरेवाडी शिवारात दुचाकीने पेट घेतल्याने देशवंडी येथील तरुणाचा मृत्यू झाला तर शुक्रवारी रात्री खासगी लक्झरी बस पेटली मात्र चालकाच्या प्रसंगावधनाने प्रवाशांचा जीव वाचला.
वाहतूक कोंडी
नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात पावणे दहा वाजेच्या सुमारास खासगी बस पेटल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार प्रकाश उंबरकर, मिलिंद शिरसाट, चालक खिळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोदरी घाटात धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी दूर करण्याचे मदत कार्य केले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी दूर झाली होती.