आंघोळीसाठी आलेले दोघे मुले बुडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 01:45 AM2022-04-18T01:45:59+5:302022-04-18T01:46:15+5:30
गंगाघाटावरील रामकुंडालगत असलेल्या गांधी तलावात आंघोळीसाठी आलेल्या दोघे अल्पवयीन मुले पाण्यात बुडाली. त्यातील एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यास जीवरक्षकाला यश आले. रविवारी (दि.१७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत विधाते मळा कालिका नगर येथे राहणारा हसनैन उमर शेख (१६) याचा नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाला.
पंचवटी : गंगाघाटावरील रामकुंडालगत असलेल्या गांधी तलावात आंघोळीसाठी आलेल्या दोघे अल्पवयीन मुले पाण्यात बुडाली. त्यातील एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यास जीवरक्षकाला यश आले. रविवारी (दि.१७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत विधाते मळा कालिका नगर येथे राहणारा हसनैन उमर शेख (१६) याचा नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, गोदावरीला पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अधिक वाढला आहे. उन्हाच्या झळांमुळे दुपारच्या सुमारास गोदापात्रात आंघोळीसाठी येणाऱ्या तरुणांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान,काही शाळकरी मुले देखील येथे डुबकी लगावण्यासाठी येतात,मात्र त्यांना पाेहता येत नसल्याने गटांगळ्या खात बुडून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. हसनैन शेख व सुनील विनोद परदेशी (१५) हे दोघेही शाळकरी मुले पोहण्यासाठी नदीपात्रावर रविवारी आले होते. यावेळी दोघे गांधी तलावात आंघोळीसाठी उतरले मात्र खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. याकडे गांधी तलावाच्या जवळच उभे असलेले अमित अशोक धारगे यांचे याकडे लक्ष वेधले गेले. त्यांनी तत्काळ नदीपात्रात उडी घेत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र हसनैनच्या नाकातोंडावाटे पोटात पाणी गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. तर सुनीलला वाचविण्यास अमित यांना यश आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली जात होती.
--इन्फो---
गोदाकाठावर हवे सुरक्षा रक्षक
गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने याठिकाणी महापालिका प्रशासनाकडून सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची मागणी होत आहे. तसेच पंचवटी, भद्रकाली पोलीस ठाण्यांच्या गस्ती पथकाकडून देखील गोदावरीच्या काठावर गस्त वाढविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. गोदापात्रात आंघोळ करणाऱ्या अल्पवयीन मुलांवर बंदी घालण्यात यावी, जेणेकरून मुलांचा जीव धोक्यात सापडणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.