नेत्रदानाची वेटिंग लिस्ट अवघ्या एक-दोन महिन्यावर!
By धनंजय रिसोडकर | Published: June 9, 2023 05:14 PM2023-06-09T17:14:41+5:302023-06-09T17:15:01+5:30
नेत्रदानाविषयी लोकांमध्ये कमालीचे समज गैरसमज असल्याचे आपण पाहतो.
नाशिक : नेत्रदानाच्या वाढत्या प्रमाणासह आधुनिक तंत्रज्ञानामुळे एका कॉर्नियातून चार अंध बांधवांना दृष्टी प्रदान करणे शक्य होत आहे. त्यामुळे शासकीय तसेच खासगी नेत्रपेढींमधील इच्छुक अंध बांधवांची वेटींग लिस्ट पूर्वीच्या तुलनेत एक दशांशने कमी झाली आहे. काही नेत्रपेढ्यांमध्ये तर नोंदणीनंतर अवघ्या एक दोन महिन्यातच नेत्र उपलब्धता होत असल्याने त्याचा लाभ अंध बांधवांना होत आहे.
नेत्रदानाविषयी लोकांमध्ये कमालीचे समज गैरसमज असल्याचे आपण पाहतो. त्यामुळे नेत्रदान, नेत्रपेढी, तिचे कार्य याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. १ वर्षांवरील व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने जिवंतपणी नेत्रदानाची लेखी इच्छा व्यक्त करणे गरजेचे आहे. त्यानंतर व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याचे नातेवाईक, मित्रमंडळींनी त्याच्या इच्छेचा मान राखत त्या व्यक्तीचे नेत्रदान करणे महत्त्वाचे आहे.
मात्र, मृत व्यक्तीच्या नेत्रदानासाठी त्याच्या वारसदाराची परवानगी घेणे आवश्यक असते. वारसदाराने परवानगी दिली नाही तर नेत्रदान होऊ शकत नाही. तसेच मृत व्यक्तीने इच्छा व्यक्त केली नसली तरी वारसदाराच्या इच्छेने नेत्रदान केले जाऊ शकते.