इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडीचा पाणीप्रश्न गढूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 11:04 PM2022-06-08T23:04:49+5:302022-06-08T23:08:58+5:30
इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका म्हणून परिचित असला तरी खैरेवाडी या आदिवासी वस्तीतील नागरिकांचा पाणीप्रश्न अतिशय गंभीर असून १०-२० कुटुंबे असलेल्या या गावातील लोकांना अत्यंत दर्जाहीन गढूळ पाणी प्यावे लागत आहे. इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अतिदुर्गम खैरेवाडी येथील हे भयानक वास्तव आहे.
इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका म्हणून परिचित असला तरी खैरेवाडी या आदिवासी वस्तीतील नागरिकांचा पाणीप्रश्न अतिशय गंभीर असून १०-२० कुटुंबे असलेल्या या गावातील लोकांना अत्यंत दर्जाहीन गढूळ पाणी प्यावे लागत आहे.
इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अतिदुर्गम खैरेवाडी येथील हे भयानक वास्तव आहे.
जनावरेसुद्धा आपले तोंड पाण्याला लावत नसून तहानलेले राहणे पसंत करीत असल्याचे दिसून आले आहे. या आदिवासी वस्तीवरील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून ३ ते ४ किलोमीटर जंगलातून पायी जावे लागते. एका आटलेल्या विहिरीत जीवावर उदार होऊन खाली उतरून गाळमिश्रित पाणी आणावे लागत आहे.
जिवंतपणी नरकयातना सोसणाऱ्या या आदिवासी नागरिकांकडून तालुक्यातील लोकप्रतिनिधीचा तसेच शासनाचा जळजळीत निषेध व्यक्त होत आहे. हा त्रास असह्य झाल्याने लोकप्रतिनिधीना या पाड्यावर पाणी प्यायला यायचे निमंत्रण आदिवासी नागरिकांनी दिले आहे.
या दुर्लक्षित पाड्यावर सरकारची मदत पोहोचेल का? कारण मागील महिन्यात येथून ५ किमी अंतर असलेल्या बिवलवाडी येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन तेथील आदिवासी बांधवांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लावला. आमचाही पाण्यासाठी संघर्ष थांबेल का, हा प्रश्न येथील संतप्त नागरिक करत आहेत.