अंबडमध्ये दुकानाचे कुलुप तोडून २१ बोकडांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 03:54 PM2021-03-24T15:54:54+5:302021-03-24T15:55:18+5:30
शुक्रवारी (दि.१२) नेहमीप्रमाणे संध्याकाळी दुकान आटोपून बोकडांना आतमध्ये दोरीच्या सहाय्याने बांधून दरवाजाला कुलुप लावून घरी आले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलुप तोडून सुमारे २ लाख रूपये किंमतीचे २१ बोकड चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नाशिक : शहरातील विविध उपनगरांमधील मटण विक्रेत्यांच्या बोकडांवर 'डल्ला' मारण्याचे सत्र चोरट्यांकडून सुरुच आहे. सातपुर येथील बोकड चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागत नाही, तोच पुन्हा अंबड गावातील एका दुकानाचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी २१ बोकडांची चोरी केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
सातपुर पोलीस ठाणे हद्दीतील कार्बननका भागातील एका खाटिकाचे गुदामाचे कुलुप तोडून मुंब्रा येथील चोरट्यांनी इनोव्हासारख्या आलिशान कारमधून २१ बोकड गायब केले होते. सातपुर गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्याचा सखोल तपास करत धागेदोरे शोधत मुंब्रा येथून एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून २६ बोकड हस्तगत केले होते. या घटनेचा छडा लागून काही दिवस लोटत नाही, तोच पुन्हा अंबड गावातसुध्दा अशाचप्रकारे २१ बोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जावेद गनी खाटीक (रा. राणेनगर, सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान आता अंबड पोलिसांपुढे उभे राहिले आहे.
अंबडमध्ये खाटीक यांचे दुकान आहे. ते शुक्रवारी (दि.१२) नेहमीप्रमाणे संध्याकाळी दुकान आटोपून बोकडांना आतमध्ये दोरीच्या सहाय्याने बांधून दरवाजाला कुलुप लावून घरी आले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलुप तोडून सुमारे २ लाख रूपये किंमतीचे २१ बोकड चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.