तीन दुचाकींसह कारची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 06:45 PM2018-09-04T18:45:02+5:302018-09-04T18:46:17+5:30
नाशिक : शहरात दुचाकी, चारचाकी व मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ सोमवारी शहरातून तीन दुचाकी, एक कार व मोबाइल असा १ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे़ या चोरीच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़
नाशिक : शहरात दुचाकी, चारचाकी व मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ सोमवारी शहरातून तीन दुचाकी, एक कार व मोबाइल असा १ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे़ या चोरीच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़
पनवेलमधील बस डेपो लाइन परिसरातील रहिवासी शिवकुमार रामास्वामी कौंडेर यांच्या वहिणीच्या नावावर असलेली ६० हजार रुपये किमतीची इंडिगो कार (एमएच ०२, एपी ९५५५) सोमवारी (दि़३) मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटलच्या समोर पार्क केली होती़ चोरट्यांनी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही कार चोरून नेली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात कार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
वडाळा-पाथर्डी रोडवरील माउंट प्लाझामधील रहिवासी नवनाथ आव्हाड यांची ३५ हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी ( एमएच १५, ईटी १६२१) चोरट्यांनी विजया बँकेजवळून चोरून नेली़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सिडकोच्या पवननगरमधील रहिवासी सुरेश छोटू मिस्तरी यांची ६५ हजार रुपये किमतीची यामाहा दुचाकी (एमएच १५ जीजे १२६८) चोरट्यांनी गंगापूररोडवरील भावीन व्हील्सजवळील महिंद्रा शोरूमच्या बाहेरील पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिडकोतील साईबाबानगर येथील रहिवासी आसिफ रफीउद्दीन पठाण यांची २५ हजार रुपये किमतीची डिस्कव्हर दुचाकी (एमएच १५, डीआर ३३२७) चोरट्यांनी त्रिमूर्ती चौकातील दिव्या अॅडलॅबजवळून चोरून नेली़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दिंडोरीरोडवरील कलानगर भाजीबाजार येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रवीण सोनवणे (रा़ अविनाश अपार्टमेंट) यांचा महागडा मोबाइल चोरट्यांनी खिशातून चोरून नेला़ याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़